मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या ना त्या वक्तव्यावरून मोहन भागवत टीकेची मानकरी होत आहेत. मात्र आज प्रजासत्ताक दिनी भिवंडींतील एका कार्यक्रमात बोलताना तिरंगा ध्वज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येबद्दल सांगितले.
मोहन भागवत म्हणाले की, आपला देश समृद्ध करायचा असेल तर भक्ती आणि ज्ञानपूर्वक कर्म करावं लागेल हा ध्वजारोहणाचा संदेश आहे. आपल्या देशाचा जो तिरंगा झेंडा आहे, त्याच्या केंद्रस्थानी धम्मचक्र आहे. धर्माचा दुसरा अर्थ पूजा असाही होता. पण धर्म तोच धर्म नाही. पूजा-अर्चा करणे या गोष्टी धर्माच्या आचरणाच्या आहेत. देशकाल परिस्थितीप्रमाणे यात बदल झाला पाहिजे असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत बोलताना धर्म या शब्दाची व्याख्या केली आहे. बंधूभाव म्हणजेच धर्म असं डॉ आंबेडकर यांनी सांगितलं. आपला समाज सद्भावनेच्या आधारावर उभा आहे. आपला धर्म सांगतो विविधतता ही निसर्गाची देणगी आहे. आपलं महत्व जरूर जपा पण देशाची एकता अबाधित ठेवा. विविधता असलेल्या इतर देशांमध्ये आपण वाद होत असल्याचे पाहतो. परंतु भारताचा मूळ स्वभाव हा विविधतेत एकता आहे.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, तुम्ही आनंदी असाल आणि घरात दु-ख असेल तर तुम्ही आनंदी राहु शकणार नाही. राज्य दुःखी असेल तर देश आनंदी राहु शकत नाही. आपल्याकडे नेहमी म्हणतात की , मोठं व्हायचं असेल तर स्वातंत्र्य हवं, समता हवी आणि पण हे केव्हा शक्य आहे जेव्हा बंधुभाव वाढेल त्यावेळी. कोणताही माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो बंधुभाव जपतो. आपल्या तिरंग्यात जो धम्मचक्र आहे तो आपला धर्म आहे. ते चक्र सर्वांना समानतेचा, बंधू भावाचा संदेश देतो, सगळ्यांना स्वातंत्र्याचा संदेश देतो. एकट्याच्या प्रयत्नाने देश महान होत नाही तर समाज जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा देश महान होतो असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा भारताचं काय होईल असा प्रश्न निर्माण झाला होता आणि सगळीकडे यांना गुलामीत जगायची सवय लागली आहे. आपल्यावर आलेली सगळी आक्रमण आपण सहन केली. पण आपण यातून बाहेर आलो. जेव्हा १९७१ ला आपण युद्ध जिंकलो तेव्हा सगळं जग आपल्याकडे आदरानं पाहू लागलं पोखरण १ आणि २ नंतर तर जगात चर्चा होऊ लागल्याचेही यावेळी सांगितले.
