नागपूर : प्रतिनिधी
दरवर्षीच्या प्रथेला पहिल्यांदाच फाटा देत यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. मात्र नागपूरात पहिल्यांदाच काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या मनसुब्यावर पाणी फिरविल्याने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणतेही कामकाज होवू शकले नाही. परंतु मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
विधान भवनाचा अधिवेशनाचा पहिल्या दिवसाचे कामकाज शोक प्रस्तावानंतर तर दुसर्या दिवसाचे कामकाज खारघरमधील जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर तहकूब करण्यात आले होते. यामुळे पहिल्या आठवड्याचे कामकाज जेमतेम दुपारपर्यंत चालल्याने शुक्रवारी सकाळी दहा वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरू करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. मात्र अधिवेशन सुरू होण्याच्या तासभर आधीच पावसाने लावलेल्या हजेरीने अख्खे नागपूरच जलमय झाले. मंत्र्यांचे बंगलेही पाण्याखाली गेल्याने त्यांना तर विधानभवनापर्यंत पोहोचणेही कठीण झाले. यामुळे सभागृहात आमदारांची संख्याच रोडावली होती.
विजेचे ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली बुडाले
सततच्या पावसामुळे विधिमंडळाच्या तळघरात असलेले विजेचे ट्रान्सफॉर्मर असलेल्या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून तो भाग पाण्याखाली बुडाला. त्यातच शॉर्टसर्किट झाल्याने तात्काळ वीजप्रवाह बंद करण्यात आला. यामुळे अख्ख्या विधानभवनात अंधार पसरला. मोबाईलच्या लाइटमध्येच आमदारांनी आणि स्वत: अध्यक्षांनी विधानभवनात प्रवेश केला. कामकाज सुरू होण्याआधीच अध्यक्षांनी तासाभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब केले. पुन्हा १२ वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा वीजप्रवाह सुरू झालाच नव्हता. यावेळी विरोधकांनी विधानसभेतील अंधारावर बोलण्याची मागितलेली परवानगी न देता अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
गटारात सापडल्या दारूच्या बाटल्या
पावसामुळे विधानभवन परिसरात अक्षरश: दीड फुटांपर्यंत पाणी साठले होते. एकीकडे आमदार या पाण्यातून वाट काढत सभागृहापर्यंत पोहोचत असताना प्रशासनाला उशिरा जाग आली. पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईला सुरुवात झाली. नाल्यात पडलेला कचरा बाहेर काढला जात असताना त्यासोबत दारूच्या बाटल्याही बाहेर निघाल्याने विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली. एवढ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बाटल्या आतपर्यंत पोहोचल्याच कशा, असा प्रश्न आमदारांकडून विचारला जाऊ लागला. या गोंधळातच कशीबशी नालेसफाई उरकून पाण्याचा निचरा करण्यात आला, पण त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसाने हा परिसर पुन्हा पाण्याखाली गेला.
