Marathi e-Batmya

“नरेंदर दे सिलेंडर!” घोषणांनी दणाणला महाराष्ट्र; वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाई, दरवाढ आणि पुरवठ्यातील विस्कळीतपणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. “नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?” आणि “नरेंदर, दे सिलेंडर” अशा घोषणांनी जिल्हा, शहर आणि तालुका स्तरावरील परिसर दणाणून गेला.

या राज्यव्यापी आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, महिला, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गॅस सिलेंडरचा तुटवडा, वाढते दर आणि काळाबाजार यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

गेवराई येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजाराविरोधात जोरदार निषेध नोंदवत प्रशासनावर कारवाईची मागणी करण्यात आली. “नरेंदर, कब देगा सिलेंडर?” या घोषणांनी परिसर दुमदुमला.

हिंगोली-औंढा नागनाथ येथे मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गॅस टंचाई, दरवाढ आणि पुरवठ्यातील अनियमितता यावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चूल पेटवा” आंदोलन करण्यात आले. महिलांनी रस्त्यावर प्रतीकात्मक चूल पेटवून भाकरी तयार करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. विविध संघटनांच्या सहभागामुळे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.

नागपूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी चुलीवर भाकर-चटणी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. गॅस टंचाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत तातडीने नियमित पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे “सिलेंडर कधी मिळणार?” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले. गॅस टंचाई आणि दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

पनवेलमध्ये मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तुटवडा, काळाबाजार आणि दरवाढीचा निषेध करत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

सोलापूरमध्ये महिलांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी, ठेचा, कांदा व मिरची भाजत प्रतीकात्मक आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

मनमाड येथे देखील “चूल मांडो आंदोलन” पार पडले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत गॅस टंचाईविरोधात रोष व्यक्त केला.

जामखेड येथे तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात संताप व्यक्त करत तातडीने पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

मिरज (सांगली) येथे वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडीच्या वतीने आंदोलन पार पडले. चुलीवर भाकर बनवून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

पैठण येथे गॅस टंचाई व दरवाढीविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जालना येथे गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून “सिलेंडर कधी मिळणार?” घोषणांनी परिसर दणाणला.

शेवगाव (अहमदनगर) येथे गॅस टंचाई, दरवाढ व काळाबाजाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते.

मुंबईतही आंदोलन पार पडले असून, राज्य प्रवक्ते उत्कर्षाताई रुपवते, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी आणि मुंबई शहराध्यक्ष ॲड. चेतन अहिरे उपस्थित होते.

एकूणच, राज्यभर उभारलेल्या या आंदोलनातून गॅस टंचाई, दरवाढ आणि काळाबाजार या प्रश्नांवर तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. गॅस सिलेंडरचा नियमित आणि सुरळीत पुरवठा तातडीने सुरू करावा, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.

Exit mobile version