Marathi e-Batmya

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्याचा प्रमुखच नियम तोडत असेल तर…

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला.

मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. दहानंतर सभा घेता नाही तो एक नियम आहे हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत तर पोलिस अधिक्षक काय करणार? अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील तर काय करणार ? असा उद्विग्न सवालही त्यांनी यावेळी केला.

विदर्भ – मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.

विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे असे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला. परंतु त्यांनी केंद्र सरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते. त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लगावला.

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे, त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे तिकडे लक्ष दिले पाहिजे असेही ते म्हणाले.

कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. दहानंतर सभा घेता नाही तो एक नियम आहे हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत तर पोलिस अधिक्षक काय करणार? अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील तर काय करणार ? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे एकंदरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री इतर व्यापात आहेत मार्गदर्शन आणि दर्शन घेत आहेत. चर्चा करत आहेत. मात्र त्याआधी १३ कोटी जनतेचे तुम्ही प्रतिनिधित्व करता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री यांच्याकडे याअगोदर अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तिथे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. शिवाय अतिवृष्टीग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी करत ते पुढे म्हणाले, राज्यातील विकासकामांना स्थगिती दिल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दल चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे विकासकामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी अशीही मागणी केली.

Exit mobile version