Marathi e-Batmya

शरद पवार यांनी जाहिर केला निर्णय; माफी मागतो, मी माझा निर्णय मागे घेतो

राजकिय आत्मचरित्राच्या लोक माझे सांगाती या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. मात्र मागील दोन दिवस कार्यकर्ते आणि नेत्यांनी दाखविलेल्या प्रेम व आग्रहामुळे अखेर आपला निर्णय मागे घेत असल्याचे सांगत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद ग्रहण करत आहे. मात्र आता येथून पुढील काळात पक्षाचे नवे नेतृत्व घडविण्यासाठी प्रयत्नशील असून उत्तराधिकारी असणे आवश्यक असल्याचे सांगत सर्वांना विश्वासात न घेता निर्णय घेतला त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो असे सांगत राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहिर केले.

सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक झाल्यानंतर त्याची माहिती या समितीच्या सदस्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर राज्यातील नेते-पदाधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर आपला निर्णय जाहिर करण्यासाठी शरद पवार हे पुन्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.

तसेच शरद पवार यांनी सांगितले की, देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे, असं मत व्यक्त केलं.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असंही नमूद केलं.

त्याचबरोबर आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची माहिती अजित पवार यांना देण्यात आली होती असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राजीनामा देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी अजित पवार हे समितीच्या नेत्यांसोबत स्वतः आलेले होते. मात्र त्यांचा त्या समितीत समावेश नव्हता. तसेच जर मी सर्व कार्यकर्त्ये आणि पक्षाच्या नेत्यांना मी राजीनामा देतोय असे सांगितले असते तर तशी घोषणाच मला करू दिली नसती असेही शरद पवार यांनी सांगितले.

Exit mobile version