Marathi e-Batmya

राष्ट्रवादीतून देशमुख, मलिक, मुश्रीफ, आव्हाड यांची नावे निश्चित

मुंबईः प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित झाली आहेत. तर नव्या चेहऱ्यांमध्ये तटकरे, निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूकीत सर्वाधित मदतीचा हात हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून मिळाला. तसेच आगामी काळातही या भागाबरोबरच राज्यातील इतर भागातही पक्ष वाढीला मदत व्हावी यादृष्टीने मंत्रिमंडळात विभागनिहाय प्रतिनिधीत्व देण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानुसार कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात ऊस आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. मात्र कोल्हापूरात माजी खासदार धनंजय महाडीक यांचे चुलत बंधू स्वरूप आणि राहुल महाडीक यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे तेथे भाजपाला शह देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना संधी दिली जाणार आहे. तर नागपूरातून अनिल देशमुख यांना पुन्हा मंत्री पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतून नवाब मलिक यांचे जवळपास नाव निश्चित झाले असून त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाड्यातून धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून टोपेंना पद दिल्यास मुंडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. सर्व नेत्यांची कॅबिनेट म्हणून वर्णी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सातारा जिल्ह्याने शरद पवार यांना पुन्हा एकदा चांगलीच साथ दिल्याने या जिल्ह्यातील आमदार बाळासाहेब पाटील किंवा मकरंद पाटील यांची कॅबिनेट मंत्री मंडळात वर्णी लागणार आहे. याशिवाय माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेला असला तरी त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करून त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यमंत्री पदी अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, कोकणातून शेखर निकम यांची वर्णी लागणार आहे. मात्र आदीती तटकरे यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version