मुंबई आणि ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेकडून हे पार्सल पाठवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच राज्यपालांनी राज्याची माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, या राज्यपालांबद्दल काय बोलावे असे शिल्लक राहीलेले नाही. मात्र कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण याचा रंग सारखाच त्यात काहीही फरक नाही अशी बोचरी टीका केला.
शरद पवार हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता वरील प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही.
राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
