Marathi e-Batmya

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने विकास कामे करा

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सुरु असलेली बांधकामे व इतर आरोग्य सुविधांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने करावीत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. राज्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हुडको अंतर्गत राज्यभर सुरु असलेली बांधकामे व इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला आमदार प्रकाश सोळंकी, आमदार सुरेश धस, आमदार सरोज अहिरे, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार नारायण पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार अमोल खताळ, आमदार गोपीचंद पडळकर,आमदार आमशा पाडवी, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार उमेश यावलकर, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई.रवींद्रन,आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट विंग (IDW) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक, व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ज्या आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधांची  ८० टक्के बांधकामे पूर्ण  झाली आहेत. त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून लोकार्पणासाठी सज्ज कराव्यात, तसेच ५० टक्के बांधकामे पूर्ण झालेल्या संस्थांच्या मनुष्यबळा संबंधीचे प्रस्ताव सादर करावेत.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, आरोग्य संस्था मधील रिक्तपदे भरताना नक्षलग्रस्त, आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील रिक्त जागा प्राधान्याने भरण्यात याव्यात. नवीन पदभरती, पदोन्नती, व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दुर्गम व ग्रामीण भागात प्राधान्याने नियुक्त करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात बाह्य स्तोत्राद्वारे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिले जाते का याची पडताळणी करावी. रुग्णालय व परिसरातील स्वच्छता तसेच सकस आहारा बाबतीत नियमांचे काटेकोर पालन करावे. आपली बांधिलकी जनतेशी असुन, ठेकेदारांच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासूनच बिले अदा करावीत. याबाबत तक्रार आल्यास कोणाची गय केली जाणार नाही.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने आरोग्य संस्था अधिक सक्षम कराव्यात.  स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी  लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. तसेच लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून समन्वयाने नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या .

बैठकीदरम्यान विविध लोकप्रतिनिधीनी आपल्या मतदारसंघातील आरोग्य सुविधा विषयक मागण्या मांडल्या. आमदार श्रीजया चव्हाण यांनी,  आरोग्य केंद्रात विशेषतज्ञ डॉक्टराबरोबरच जनरल फिजिशियन देण्याची, व डायलिसिस सेवा सुरू करण्याची मागणी केली. आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर येथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. आमदार सुहास बाबर यांनी पारे (विटा) येथील आरोग्य संस्थेतील रिक्त पदे भरण्याची मागणी केली. आमदार सरोज अहिरे यांनी गिरणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, तसेच सोनोग्राफी मशीनसाठी पूर्णवेळ तंत्रज्ञ उपलब्ध करून  देणे व भगूर येथील रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

आमदार प्रकाश सोळंके वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा बाबत व सुरेश धस, आमदार  नारायण पाटील, यांनी पदनिर्मिती, बांधकाम प्रस्तावाबाबत सूचना मांडल्या. आमदार उमेश यावलकर यांनी ब्लड स्टोरेज युनिटची मागणी केली. आमदार मंजुळाताई गावित यांनी आरोग्य सुविधांबाबत मुद्दे उपस्थित केले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गडचिरोली जिल्ह्यात टीबी रुग्णालय उभारणे, मलेरिया विभागासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमणे, आयसीयु मध्ये दर्जेदार औषधे उपलब्ध करून द्यावीत,कर्मचाऱ्याना नियमित प्रशिक्षण द्यावे तसेच गडचिरोली येथील सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण करू नये, अशी सूचना केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जाहिरातीच्या अनुषंगाने बिंदू नामावली तपासून पाहण्याची मागणी केली.तसेच ठाणे व पालघर जिल्हा रुग्णालय तसेच मनोर रुग्णालयाच्या लोकार्पणाच्या अनुषंगाने बैठकीत आढावा घेतला.

Exit mobile version