Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा मन:पूर्वक आभारी असल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हॅंडलवर व्हीडिओ पोस्ट करुन व्यक्त केली.

अकोला येथे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सहभागी व्हावे किंवा नाही याबाबत अंतिम भूमिका जाहिर करण्यासाठी फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मते जाणू घेतली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या ट्विटर हॅडलरून वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती. त्यामुळे मी पण या ठिकाणी लाचारी मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तीगत वाद किंवा हेवेदावे येऊ दिले नाही. पण, जिथे चळवळीलाच लाचार केले जाते, संपवले जाते. त्या ठिकाणी आम्ही हे मान्य करणार नाही.

पुढे बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझे आवाहन आहे की, आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे. पण, काही गोष्टी बोलू शकत नाही. मात्र, अनेक ठिकाणी आपण जिंकलो आहोत. तेव्हा चळवळीचा विचार हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तसेच व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो. आपण सार्वजिनक जीवन जगतो, त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जो सार्वत्रिक निर्णय घेतला जातो. त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे. तसेच, त्याप्रमाणे वागले पाहिजे असेही सांगितले.

तसेच, वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा असल्याचे मी गृहीत धरतो असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

Exit mobile version