Marathi e-Batmya

आमचे अर्थतज्ञ मदत करतील, पण पंतप्रधानांनी काँग्रेसकडे यावे

नवी दिल्ली: प्रतिनिधी

१९९१ ते २०१२ या काळात जे धोरण होते ते आता राबवले जात नाही. नरेंद्र मोदी म्हणाले मी नवीन धोरण आणणार पण त्यांनी ते केले नाही. नोटाबंदीचा काय फायदा झाला का?, मेक इन इंडियाचे काय झाले? आज नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. १९९० मध्ये सुद्धा प्रचंड अपयश आले होते. त्यावेळी काँग्रेसने नवा दृष्टीकोन स्वीकारला होता याची आठवण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करून देत आजही तीच गरज आहे. काँग्रेसच्या मनात स्पष्ट कल्पना आहे. पण ही गोष्ट अर्थमंत्री, नीती आयोग, थिंक टॅक्स यांना समजतच नाही. पंतप्रधानांनी हवे तर काँग्रेसकडे मदत मागावी, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील अशी उपरोधिक टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

गॅस आणि इंधन दरवाढीच्या अनुषंगाने काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

अर्थव्यवस्था अपयशी ठरत आहे. शेअर बाजारात तेजी आहे, पण त्यामध्ये केवळ ५० कंपन्या वाढत आहेत. देशातील ३०० ते ४०० प्रमुख कंपन्यांची स्थिती खालावत आहे. ते देशाचे भविष्य आहेत, पण त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. मध्यमवर्गीय उद्योग देशाला रोजगार देतात, पण मोदीजींच्या मनात त्यांच्यासाठी स्थान नसल्याचेही ते म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे आणि यामुळे जनतेला त्रास होत आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सातत्याने कमी होत असूनही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज भारताची मालमत्ता विकली जात आहे, पण हा पैसा कुठे जातो असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकांचा आवाज दडपला जात आहे, संसदेत चर्चा होऊ देत नाही, ज्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. शेतकऱ्यांपासून मजूर, छोटे व्यापारी, पगारदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपतींसाठी नोटाबंदी झाली. पण मोदीजींच्या ४-५ मित्रांसाठी या दरम्यान कमाई झाली आणि वारंवार आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Exit mobile version