Marathi e-Batmya

रामदास आठवले यांची घोषणा, मुंबईतील तालुका आणि वार्ड कमिटी बरखास्त

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व तालुका आणि वॉर्ड कमिटी बरखास्त करण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाच्या आझाद मैदानातील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली.या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष  बाळासाहेब गरुड; मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार; कोषाध्यक्ष सुनील मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील सर्व वॉर्ड तालुका कमिटी बरखास्त आज करण्यात आल्या असून मुंबईत नव्याने वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड कमिटी आणि तालुका अध्यक्ष तालुका कमिटी  निवडण्यासाठी येत्या ५ एप्रिल पर्यंत मुंबईत वॉर्ड तालुका कार्यकारिणी च्या  निवडणुका घेऊन निवड करण्याचे अधिकृत आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत. त्यासाठी येत्या २५ फेब्रुवारी पासून  मुंबईत सर्व वॉर्ड तालुका जिल्ह्यात पक्षसदस्य नोंदणी करून क्रियाशील सदस्यांना वॉर्ड आणि तालुका कमिटी च्या निवडणुकीत सहभागी होता येईल.निवडणूक घेऊनच मुंबईत सर्व वॉर्ड आणि तालुका अध्यक्ष निवडण्याचे आदेश पक्षाध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी दिले आहेत.

मुंबईतील पक्ष सदस्य नोंदणी आणि वॉर्ड तालुका कमिटी निवडणूक येत्या 5 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश रामदास आठवले यांनी दिले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील पक्षसंघटनेत नव्याने प्राण फुंकण्यासाठी नव-तरुणांना रिपब्लिकन पक्षात संधी देण्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड कमिटी सर्व  तालुका अध्यक्ष तालुका कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आहे.त्यानुसार आज झालेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला.

Exit mobile version