Marathi e-Batmya

केंद्रीय मंत्री गडकरींपाठोपाठ आता सरसंघचालक भागवतांकडून सैन्यदलाचा अवमान

नांदेड : प्रतिनिधी

भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात. पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत सैन्य दलाचा अवमान केल्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली.

काही दिवसांपूर्वी बँलार्ड पिअर्स येथील इंदिरा डॉक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमात नेव्ही दलाचे इथे काय काम असे सवाल करत तुम्ही सीमेवर जा असा उपरोधिक सल्ला केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी देत सैन्याचा अवमान केला. त्यापाठोपाठ आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात अशाच आशयाचे वक्तव्य करत सैन्य दलाचा अपमान केला.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करीत असून आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ सैन्यदलाची व देशाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, ज्यावेळी भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावून जम्मू काश्मीरमधील सुंजवान येथे दहशतवाद्यांशी लढत होते. त्यावेळी मोहन भागवत यांनी लष्कराच्या अगोदर संघ स्वयंसेवक तयार होतील असे वक्तव्य केले.  त्यांचे वक्तव्य लष्कराचे मानसिक खच्चीकरण व अवमान करणारे आहे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधीत लढण्याच्या वेळी माफी नामे लिहून देणारे, ब्रिटिशांशी हातमिळवणी करून स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्यासाठी मदत करणारे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आज देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वत:च्या बेगड्या देशभक्तीची ग्वाही देत आहेत.

संघाचा हा अत्यंत घृणास्पद प्रकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version