Marathi e-Batmya

सावध व्हा, सत्तेच्या पाठबळामुळे मनुवाद पुन्हा जोर पकडू लागलाय

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दलित, पीडित, शोषीत समाजाच्या अधिकारासंदर्भात पोटशूळ असून आरक्षणासंदर्भातील खदखद संघाच्या प्रमुखांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर येत असते. मागासांना घटनेने दिलेले आरक्षण संघाच्या डोळ्यात सलत असल्यानेच सरसंघचालक आरक्षणासंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये करून जाणिवपूर्वक आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत असतात. सत्तेच्या पाठबळामुळे मनुवाद पुन्हा जोर पकडू लागलाय, जनतेने सावध व्हावे! असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.
संघ विचारधारा मनुस्मृतीच्या पगड्यातून कधीही बाहेर पडणार नाही. संघ विचारांचा पहिला हल्ला हा अल्पसंख्यांकाविरोधात जरी दिसत असला तरी दुसरा हल्ला हा दलित समाजाच्या हक्कांवर असणारच असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मनुस्मृती सारखा ग्रंथ असताना संविधानाची गरज काय? असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या मुखपत्रात म्हटलेलेच होते. देश पातळीवरती अल्पसंख्यांकाबरोबरच दलित समाजावरती वाढत चाललेले हल्ले हे याच वैचारिक पार्श्वभूमीवर आधारीत आहेत. संघ आणि भाजपने सत्तेचा कितीही वापर करून दलितांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पक्ष त्याचा निकराने विरोध करेल असे आश्वासक उद्गारही त्यांनी काढले.

Exit mobile version