Marathi e-Batmya

राज्यघटनेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना घटनेच्या शिल्पकाराचाच विसर

मागील १५ वर्षापासून विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपासून सातत्याने सत्ताधारी भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच घटक पक्षाकडून राज्यघटनेचा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत तर प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत होता. मात्र राज्यात सत्तास्थानी येताच भाजपा आणि प्रणित महायुतीबरोबरच विरोधक अर्थात महाविकास आघाडीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्यासह सर्व महापुरूषांचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्लीत संसदेत पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मस्तकी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना लावली होती. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच पंतप्रधान झाल्याची प्रतिपादन केले. परंतु राज्यातील विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होताच मात्र सत्ताधारी महायुती कडून विधानभवन परिसरातील राज्याचे आराध्य दैवत असलेल्या फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनाच अभिवादन करण्यात आले. तर त्याच विधान भवनाच्या परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पासमोर जावून त्यांनाही अभिवादन करण्यास मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदार मात्र धजावले नसल्याचे दृष्य पाह्यला मिळाले.

वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकिय संस्कृतीप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. मात्र विधानसभा अधिवेशन कालावधीत नेमके मात्र याच्या उलट घडत आले. सत्ताधारी पक्षाकडून अर्थसंकल्प असेल किंवा नव्याने सत्तास्थानी विराजमान होत असेल त्यावेळी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनाच अभिवादन केले जाते. मात्र महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच महाराष्ट्राच्या जडणघडीत महत्वाचे योगदान असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही सत्ताधाऱ्यांनी अभिवादन करावे अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या निमित्ताने करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आता थांबणार नाही… अशी घोषणा देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी किमान या बदलात विधानभवनाच्या आवारात असलेल्या पुतळ्यांना अधिवेशन काळात तरी किमान अभिवादन करण्याचे नवे संकेत रूढ करावे अशी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version