Marathi e-Batmya

एसटी महामंडळात नव्याने रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार

मुंबई  : प्रतिनिधी

एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. ही कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल असेही त्यांनी सांगितले.

मंत्री रावते म्हणाले, एसटी महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागते. या काळात कमी वेतनामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयावर संचालक मंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात येईल.

एसटीमध्ये पूर्वी नवीन कर्मचारी भरती झाल्यानंतर त्याला सुरुवातीची ५ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. तो कालावधी नंतर ३ वर्षावर आणण्यात आला. आपण तो कालावधी १ वर्षावर आणला. पण आता हा कालावधीही रद्द करण्यात येईल, या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version