Marathi e-Batmya

साहेबराव कांबळेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी केला.

प्रवेश सोहळ्यात साहेबराव कांबळे यांच्यासह सूर्यकांता दिंडाळकर, राहुल वानखेडे, प्रफुल्ल खंदारे, विद्यानंद नलावडे, कैलास घोगरे, नामदेवराव शिंगणकर, पंजाबराव भालेराव, रवींद्र जाधव, संतोष चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेस, महिला आघाडी, खरेदी-विक्री संघ आणि विविध संघटनांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यावेळी प्रवेश केला. त्यामध्ये उपनगराध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड-महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल ९३ हजार मते मिळविणारे साहेबराव कांबळे हे प्रभावी नेतृत्व असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव कांबळे यांनी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. आता ते शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी अधिक जोमाने काम करतील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “संजय राठोड हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासह आता दुष्यंत चतुर्वेदी हेदेखील पक्षाकडून बिनविरोध निवडून आले आहेत. साहेबराव कांबळे यांच्यासारखे तडफदार कार्यकर्ते पक्षात आल्याने त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम आम्ही करू,” असे सांगत यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, पीक विमा, वीटभट्टी कामगार भगिनींना शासकीय योजनांचा लाभ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी तसेच विविध विकासकामांना गती देण्यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले.

स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री, आमदार आणि शासन यंत्रणा समन्वयाने काम करेल, असेही ते म्हणाले.

साहेबराव कांबळे यांनी काँग्रेसची विधान परिषदेची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विकासासाठी एकत्र आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिवसेना ताकद देईल. शब्दाला जागणारा कार्यकर्ता अशी साहेबराव कांबळे यांची ओळख असल्याचेही नमूद केले.

विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विकासाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. संबंधित भागाचा विकास व्हावा, तेथील जनतेची कामे मार्गी लागावीत या भावनेतून साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महाविकास आघाडीवर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. महायुतीमध्ये एकवाक्यता असून सर्व १७ उमेदवार दमदारपणे निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

लाईव्ह कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस सखोल चौकशी करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला कार्यक्रम हा संपूर्ण सरकारचाच कार्यक्रम होता. विरोधकांकडे कोणतेही प्रश्न नसल्याने ते प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही केली.

Exit mobile version