Marathi e-Batmya

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक आयोगाकडून जाहिर

देशातील विशेषतः उत्तर भारतातील चार आणि ईशान्येकडील एका राज्यातील विधानसभांचा कालावधी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणूका होत असल्याने हाच कल पुढील लोकसभा निवडणूकीत कायम राखला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर केले.

आयुक्त राजीवकुमार पुढे बोलताना म्हणाले, मिझोराम राज्यासाठी विधानसभा निवडणूकीसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेशमध्य एकाच टप्प्यात अर्थात १७ नोव्हेंबर रोजीच मतदान घेण्यात येणार आहे.

राजस्थानमध्येही एकाच टप्प्यात सगळ्या विधानसभा मतदारसंघासाठी २३ नोव्हेंबर रोजी, तर तेलंगणा राज्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार येणार असल्याचे सांगितले.

मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पाचही राज्यातील मतमोजणीची प्रक्रिया ३ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपूर्वी या पाचही राज्यातील नव्या विधानसभा अस्तित्वात येणार आहेत.

या पाच राज्यातील ६७९ विधानसभा मतदारसंघासाठी १ लाख ७७ हजार मतदान केंद्रे उभारली जाणार असून आंतरराज्य सीमावर्ती भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

Exit mobile version