Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री… निवडणूक लढवायची याचा निर्णय ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी घेणार

जेव्हा जनता पक्षाची निर्मिती झाली तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हते. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणून निवडून आले. आज, आम्ही लोकांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही त्यांना त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारा पर्याय देऊ शकतो. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळाचा कोण भाग आहे हे आपण ठरवू शकतो,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल निवडणूकीनंतर उमेदवार ठरवणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी चिपळूण, रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी जागावाटप वाटाघाटीबाबत पत्रकारांना माहिती दिली.

महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, एक प्रक्रिया सुरू असल्याचा पुनरुच्चार करत ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोंबर रोजी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, कोणत्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष असावा, असा विचार करण्याचा अधिकार आहे. मी यावर काहीही भाष्य करू शकत नाही. आम्ही तिन्ही आघाडीच्या भागीदारांसोबत जागावाटपासाठी एक समिती तयार केली आहे. ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी कोणती जागा लढवायची याचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) किती जागा लढवणार याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, इतर पक्षांनी आमच्यासाठी ज्या काही जागा सोडल्या आहेत, त्या सर्वांवर लढण्यात आम्हाला आनंद असल्याचे सांगत थेट उत्तर देण्याचे टाळले.

सीपीएम, सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष या पक्षांना एकत्र आणून एक व्यापक विरोधी आघाडी निर्माण करण्याच्या युतीच्या इराद्यावरही शरद पवार म्हणाले की, सत्ताधारी महायुती सरकारच्या विरोधात एकजूट उभारण्यासाठी ही युती महत्त्वाची आहे. लाडकी बहिन योजना आणि या योजनेची प्रसिद्धी दिशाभूल करणारी आहे. आणि स्वतःच्या सरकारच्या कार्यकाळाशी त्याचा विरोधाभास असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी महाराष्ट्र सरकारमध्ये काम केले आहे. जवळपास २४ वर्षांपासून मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा एक भाग होतो. जवळपास १५ ते १६ वर्षे मी मंत्री होतो. ९ वर्षे मी मुख्यमंत्री होतो. माझ्या समजुतीनुसार, जेव्हा सरकारने एखादी योजना जाहीर केली तेव्हा सरकारच्या तिजोरीतून पैसे आले. ते माझ्या खिशातून आलेले नाहीत. म्हणूनच, आम्ही कधीही आमचे फोटो लावले नाहीत आणि आम्ही आमच्या खिशातून या योजनांना निधी देत ​​आहोत असे भासवले, नसल्याचा उपरोधिक टोलाही महायुती सरकारला लगावला.

महाविकास आघाडीच्या अजेंड्याला जनतेच्या पाठिंब्याबद्दल खात्री असल्याचे सांगत शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज आम्हाला असे वाटते की लोकांची मानसिकता आम्हाला मदत करण्याची आहे. त्यामुळेच आम्ही आमचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. इतरांनाही त्यांचा अजेंडा लोकांपर्यंत नेण्याचा अधिकार आहे. पण जनता आमच्या अजेंड्याला साथ देईल अशी आशा व्यक्त केली.

वक्फ विधेयकाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी संसदेत विधेयक घाईघाईने मंजूर करण्यास विरोध करणाऱ्या आणि संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सखोल पुनरावलोकन करण्याची मागणी केली असल्याचे सांगत वक्फ विधेयक संसदेत मांडले गेले तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्याला ठाम विरोध केला. विधेयक जेपीसीकडे पाठवा आणि सर्व पक्षांची मते घ्या. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. आता हे विधेयक चर्चेविना मंजूर होण्याऐवजी चर्चेत येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

जुनी पेन्शन योजना आणि तिचे संभाव्य पुनरुज्जीवन याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. पेन्शन सुधारणांवर सर्वोत्तम मार्ग निश्चित करण्यासाठी चर्चा आणि समिती स्थापन करणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का असा सवाल केला, त्यावर शरद पवार यांनी लागलीच उत्तर देत म्हणाले की, कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत, असे सांगत उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये एकच हशा उसळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत