बीड: प्रतिनिधी
आपल्या पक्षातून निघून जाताना या विभागातील नेत्यांनी विकासासाठी पक्ष सोडल्याची कबुली दिली पण मग प्रश्न पडतो की, पक्षात असताना तुम्हाला १५ वर्ष आमदार मग राज्य मंत्री केलं मग त्यावेळी तुम्ही नेमकं केलं काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.
गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर मंडळींनी पक्ष सोडत भाजपात प्रवेश केला. मात्र भाजपात जाताना पक्षांतर केलेल्या प्रत्येक आमदार, माजी मंत्र्याने विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याची जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातून गेलेल्यांच्या बाबत पहिल्यांदाच भाष्य केले. बीड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आम्ही पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे काम केले आहे. हा महाराष्ट्र तरुण पिढीच्या हाती देणार आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरी विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. यात एका बाजूला संपत्तीचा डोंगर, तर दुसऱ्या बाजुला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा दर्यासागर आहे. या समुद्राच्या पाण्याने संपत्तीचा डोंगर उध्वस्त करण्याची ताकद तुमच्यात असल्याचे त्यांनी तरूणाईला सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे, बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडीत, माजलगावमधून प्रकाश सोळंकी आणि केजमधून नमिता मुंदडा या युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत युवावर्गाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पक्षातर्फे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्याची सुरूवात आज बीड येथून करण्यात आली. आष्टी येथील उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखानदारी बंद… शेतकरी संकटात आलाय… बेरोजगारी वाढत आहे… तरी हे राज्यकर्ते मत मागण्यासाठी येत आहेत. यांनी राज्यात आणलेल्या प्रत्येक योजनेत अपयश आले असून अशा लोकांना पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी भाजपाला दिला.
निवडणूकीच्या आधी राज्यातील जनतेला भेटण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. आज नवी पिढी आणि शेतकरी वर्ग मला अस्वस्थ दिसतोय. ज्यांच्या हाती आपण सत्ता दिली. त्यांनी शेतकऱ्यांची आणि तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप करत राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा समोर आलाय. शेतकऱ्यांनी कर्ज काढले पण त्यात सवलती मिळाल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या अब्रूचा पंचनामा होत आहे. कुठे मुलीच्या लग्नात अडचण तर कुठे मुलांच्या अर्ध्या शिक्षणाची व्यथा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
संसदेत दर दोन वर्षांनी कर्जमाफीची आकडेवारी सादर केली जाते. यात व्यावसायिकांचे ८६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही. मी मुख्यमंत्री असताना तब्बल ७१ हजार कोटीची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही सत्तेत असताना शिक्षणावर जास्त भर दिला. आज देशात तसेच राज्यात शिक्षित मोठ्याप्रमाणावर आहेत. मात्र नोकरीच मिळेनाशी झाली आहे. नोकरीचे प्रमाण कमी तर अर्जदाराचे प्रमाण वाढत आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक कारखाने असताना याठिकाणी १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. तर मुंबईत १२० गिरणी कारखाने असताना त्यातील ११४ कारखाने बंद पडले असून त्याच्या जमिनीवर मोठमोठ्या इमारती उभारल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षातून विकासासाठी गेलेल्यांना आमदार, मंत्री केले होते, त्यांनी काय केले?
