Breaking News

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत शिर्डी एमआयडीसीची निवड रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटींची मान्यता

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महसूल तथा पालकमंत्री अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील,
माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्रधान सचिव उद्योग हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, विकास आयुक्त डॉ.दीपेंद्रसिंह खुशावत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, यांच्यासह उद्योजक कौस्तुभ धवसे, गणेश निबे व इतर औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शिर्डी एमआयडीसी परिसर हा ५०२ एकर असून यातील २०० एकर जागा सवलतीच्या दरात देण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच इतर सवलतीच्या दरांसाठी राज्यमंत्रीमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

सदरचा निर्णय हा शिर्डी, अहमदनगर, नाशिक तसेच आसपासच्या जिल्ह्यासाठी महत्वाचा असून यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी क्षेत्र हे देवस्थान म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून उदयास येईल असा विश्वास मंत्री विखे पाटिल यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत