Breaking News

उध्दव ठाकरे यांचा सवाल, जे सन्मानाने झालं असते ते घातापाताने का? भाजपासह बंडखोरांवर साधला निशाणा

तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली असून ठाणे महानगरपालिकेचे एक महिला नगरसेविका वगळता सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाल्याचं बोललं जात असल्याचे सांगण्यात येत असून यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरासह भाजपाला खोचक सवाल करत जे सन्मानाने झालं असते ते घातपाताने का? अशी विचारणा केली आहे.

तसेच शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे कायदे तज्ञांकडून मला सांगण्यात आले आहे. जी काही पक्षाची आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आहे. त्या आधारे हे मला सांगण्यात आले आहे. माझा न्यायव्यवस्थेवर आणि न्यायमंदिरावरही विश्वास असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मागील काही दिवसांत जे काही घडलं, ते जनतेला मान्य नाही, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका घ्या, अशी मागणी करत ते पुढे म्हणाले, मला सर्वसामान्य जनतेला धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यांची ओळख नाही असे अनेक लोक मेसेज पाठवत आहेत. हळहळ व्यक्त करत आहेत. जे काही घडलं ते या लोकांना मान्य नाही. त्यामुळे हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या असे आव्हान त्यांनी बंडखोरांसह भाजपाला दिले.

भारतीय पक्षाने जेव्हा घात केला, तेव्हाच आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे, ते जर अडीच वर्षांपूर्वी केलं असते, तर सगळं सन्मानाने झालं असतं. दोन हजार कोटी, तीन कोटी खर्चाचे आकडे येत आहेत. मात्र अडीच वर्षापूर्वी हे सन्मानाने झालं असतं. जे सन्मानाने झालं असतं ते घातपाताने का केलं? जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती, ती एवढा खर्च करुन का केली? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मला असं वाटतं की, विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. जर आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे. आम्ही घरी बसू. ते जर चुकले असतील, तर जनता त्यांच्याबद्दल जो निर्णय घेईल तोदेखील आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या लोकांनी आणि पक्षाने ठाकरे कुटुंबावर विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात अशा शब्दांत सुनावलं. तसंच तुमचं ठाकरे कुटुंबावरील प्रेम खरं आहे का? अशी विचारणा केली. महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत प्रयत्न चालले होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या लोकांना मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल प्रेम आहे याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे. आजदेखील तिकडे गेल्यानंतरही आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे याबद्दल धन्य झालो. पण हेच प्रेम गेली अडीच वर्ष जी लोक, पक्ष याच घरावर, कुटुंबीयांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका करत होती, तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एकानेही त्याला विरोध केला नव्हता अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात, त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात, मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत