Marathi e-Batmya

उध्दव ठाकरे म्हणाले, निष्ठेचे कितीही दुध पाजल तरी औलाद गद्दारच

एक गुलाब गेलं. पण दुसरं गुलाब वाघ आले. नागाला कितीही दुध पाजा. तो चावतो म्हणजे चावतोच! त्या सर्वांना निष्ठेचे कितीही दुध पाजलं तरी औलाद गद्दारच निघाल्या अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली.

उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जळगाव आणी नाशिक येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटावयास आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती.
यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके, गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे. राजकारणात हार जीत होत असते पण आता यांनी संपवण्याची भाषा केली जात आहे. यापुर्वी कोणत्याही राजकारण्याकडून कोणाला संपवण्याची भाषा झाली नव्हती.

ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत अनेकवेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजपा अध्यक्षांनी बोलून दाखवलेच आहे.

म्हणून आपली लढाई दोन-तीन पातळ्यांवर आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण कमी पडणार नाही. कायद्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आपले वकील किल्ला लढवत आहेत. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. तिसरी लढाई देखील तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो. येथे येण्यापेक्षा जागेवरच पाय रोवून उभे राहा. ही लढाई मात्र कागदाची आहे.

Exit mobile version