Marathi e-Batmya

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उध्दव ठाकरे यांना सांगून शिवसेना सोडली…

नुकतेच शिवसेनेतील १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या १२ पैकी एकजण असलेले खासदार श्रीरंग बारणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपासोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला राज्यातून संपवू पाहत आहे, हे वारंवार पक्षप्रमुखांच्या लक्षात आणून दिले होते, असे सांगत उध्दव ठाकरे यांना पूर्वकल्पना देऊन आणि त्यांच्याशी चर्चा करूनच आपण शिवसेना सोडल्याचे सांगितले.

शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्यानंतर खासदार बारणे शुक्रवारी पुण्यात आले असता, त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना बारणे म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा-शिवसेनेची युती झाली पाहिजे. या मताशी लोकसभेतील शिवसेनेचे १२ खासदार सहमत आहेत. उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही ही भूमिका मांडली होती. २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपा-शिवसेना युतीला कौल दिला होता. महाविकास आघाडी नंतरच्या काळात झाली. सत्तेत एकत्र असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे निदर्शनास आणून दिले होते. २०२४ च्या लोकसभेचा विचार करता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि राज्यात शिवसेना-भाजपा युती असायला हवी. ही आमची भूमिका कायम आहे.

राज्यातील बहुतांश शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला संपवण्याचे राजकारण होत असल्याचे आणि महाविकास आघाडीबाबत फेरविचार करण्याचे आवाहन करत होते. मात्र, राष्ट्रवादीची आघाडी तोडण्यास पक्षप्रमुख तयार नव्हते. मात्र आम्ही पुढचा विचार करून भाजपासोबत राहणार आहोत. मावळ मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडण्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने त्यावर भाष्य केले नाही की विरोध दर्शवला नाही. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीच्या माध्यमातून निर्णय घेतील. २०२४ मध्ये मी मावळचा उमेदवार असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षप्रमुख होण्याबाबत कोणताही मनोदय नाही. आम्ही भाजपसोबत जाण्याची जी भूमिका घेतली आहे त्याचे शेवटपर्यंत समर्थन करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या खासदारांना कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. सर्वाधिक निधीचा वापर राष्ट्रवादीकडून होत होता. खासदार संजय राऊत यांची कार्यपध्दती चुकीची आहे. रोज उठून कोणाच्या घरावर दगड मारण्याची आवश्यकता नसते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Exit mobile version