Marathi e-Batmya

त्या शोकप्रस्तावातील चुकीच्या वाचनाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी

विधानसभेत पद्मविभूषण तथा प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या शब्दोच्चारातील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. शब्दोच्चारातील चुकांमुळे राहुल नार्वेकर यांच्यावर राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असून, शोकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुका या केवळ तांत्रिक कारणांमुळे झाला असल्याची सारवा सारव आज विधानसभेत राहुल नार्वेकर यांनी केली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी स्वर्गीय प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले, गायिका सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या माजी दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना शोकप्रस्तावाच्या वाचनात असंख्य चुका केल्या. या चुकांवरून राहुल नार्वेकर यांच्यावर समाज माध्यमातून टीका झाली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत यांनीही राहुल नार्वेकर यांना त्यांच्या मराठी वाचनावरून फटकारले होते.

या पार्श्वभूमीवर आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच राहुल नार्वेकर यांनी याबाबत खुलासा करत दिलगिरी व्यक्त करत पुढे म्हणाले की, त्या दिवशी सभागृहात एकूण १२ शोकप्रस्तावांचे वाचन करायचे होते. माझ्या हातात आलेली प्रत अत्यंत छोट्या आणि अस्पष्ट अक्षरामध्ये होती. त्यात काही तांत्रिक त्रुटीही होत्या, ज्या सुरुवातीला लक्षात आल्या नव्हत्या. त्यामुळे वाचन करताना जशा चुका मजकुरात होत्या, त्याचप्रमाणे त्या माझ्याकडून वाचल्या गेल्या. हे एका चुकीमुळे घडले असून त्याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये, अशी सारवासारवही यावेळी केली.

मराठी भाषेचा मलाही अभिमान

शेवटी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, गेली साडेचार वर्षे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक भाषणे, शोकप्रस्ताव आणि सभागृहाचे संपूर्ण कामकाज आपण मराठी भाषेतूनच हाताळले आहे. त्यामुळे या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा जितका अभिमान आहे, तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे. स्वर्गीय आशा भोसले यांचा अवमान करण्याचा विचार कोणत्याही मराठी माणसाच्या मनात येऊ शकत नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदावर असताना असा विचार तर मुळीच शक्य नाही. तरीही या घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरणही यावेळी दिले.

Exit mobile version