Marathi e-Batmya

सुनेत्रा अजित पवार यांची भावना, अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार

अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करु नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना सुनावले आहे.

दादांच्या अपघातानंतर काहीतरी ठोस निर्णय आला पाहिजे हे सर्वांना वाटत आहे आणि आम्हीही त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आलो आहोत हे सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शब्द दिला आहे. तो शब्द पाळण्यासाठी कसोशीने ते प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत. माझा यंत्रणांवर, कायदा, संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.

सतत मीडियामध्ये येणं म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का अशी शंका उपस्थित करतानाच  दादांची आई, दादांची मुलं आणि मी यांच्यापेक्षा दु:ख कुणाला होणार आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा असेही सुनेत्रा पवार यांनी सुनावले आहे.

Exit mobile version