मुंबई लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. दक्षिण मुंबईतील ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला अनेक मंत्री आणि आमदार गैरहजर असल्याची माहितीपुढे आली आहे. यापार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळण्यासह अन्य मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील १० ते १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, पक्षाचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत पक्ष संघटन वाढविण्याचा प्रयत्न करू.
बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली का? या प्रश्नावर सुनिल तटकरे म्हणाले की, याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत निर्णय घेतील असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.
अजित पवार गटाचे १० ते १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी विधाने केली जातात. अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात निर्माण झालेले वातावरण आणि यशानंतर अनेकजण आनंदी होत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान हा बनावट व्हिडीओ कोणी बनवला, तो कसा तयार केला आणि त्यानंतर कोणत्या मतदारसंघात प्रसारित झाला, याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असून सर्व आमदार त्यांच्या पाठीशी आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशिवाय पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात लोकसभेच्या चार जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र रायगडची एकच जागा जिंकता आली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. अजित पवार यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये काही आमदारांसह राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले.
