पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या २५ वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे. इथला विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचवला जाईल आणि वेगवेगळे कार्यक्रम दिले जातील असे सांगत महाराष्ट्रात दादांच्या रुपाने आपल्या पक्षाला चेहरा मिळाला आहे. मुंबईमध्ये दादांचा हाच चेहरा मनपा निवडणुकीत पुढे आणायचा आहे. मुंबई शहरात २५ वर्षात जितके कधी यश मिळाले नाही ते यश अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के मिळेल आणि आगामी काळात मनपात स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा नक्की प्रयत्न केला जाणार आहे असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, जशी यशवंतराव चव्हाण यांची आधुनिक शिल्पकार म्हणून ओळख आहे तशी अजितदादांनी केलेल्या विकासामुळे आधुनिक शिल्पकार म्हणून नोंद होईल. सदस्य नोंदणी अभियान आपण सुरु केले आहे. नोंदणीत जो चांगलं काम करेल त्याचा पक्ष नक्कीच विचार करेल. पक्ष संघटन वाढवत असताना आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, दादा…! गर्दी आणि तुम्ही याचं अतुट नातं आहे. दादा तुमची विचारांची उंची मोठी असल्यानेच हे घडत आहे. नवीन पर्व येऊन समोर उभं राहिलं आहे. आता ३१ मार्चपर्यंत सभासद नोंदणी पूर्ण करायची आहे. दिवसाचे २४ तास आपल्याला पक्षासाठी काम करायचे आणि ते चढत्या क्रमाने असले पाहिजे आणि हे काम झोकून देऊन करा असे आवाहनही यावेळी केले.
या शिबीरात आजच्या दुसर्या दिवशी सकाळी संविधानावर आधारीत चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर ‘शिव – शाहू – फुले – आंबेडकर पुरोगामी विचारधारा’ या विषयावर लहूजी कानडे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, नंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही आपले विचार मांडले.
या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करा – प्रफुल पटेल
पक्षाची मर्यादा ओळखून कार्यकर्त्यांनी श्रध्दा आणि सबुरीने पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे. पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पाच महिन्यातच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पराजयाचा विजय करुन दाखवलात त्याबद्दल प्रफुल पटेल यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.
शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही असे पंतप्रधानांना महायुतीत जाताना सांगितल्याचे प्रफुल पटेल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची संधी आपल्या जवळ आहे. काँग्रेस ज्यापध्दतीने चुकीचे मेसेज फिरवत आहे ते खोडून काढण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपली विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करायचे आहे. तसा निर्धार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येतील असेही प्रफुल पटेल म्हणाले.
