महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एक नवी प्रथा निर्माण करण्यात आली असून या प्रथेनुसार विधिमंडळाचे कोणतेही अधिवेशन असो पण त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नव्या प्रथे प्रमाणे पुरवणी मागण्या सादर करायच्या आणि त्या अधिवेशन संपेपर्यंत मंजूर करून घ्यायचे. त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन २०२५ – २६ या वर्षाच्या ७५ हजार २८६ कोटी ३७ लाख ५९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
या पुरवणी मागण्यांवर १० आणि ११ डिसेंबर रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. पुरवणी मागणीत नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी खर्चासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वैशिष्टपूर्ण कामांसाठी महानगरपालिका तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अनुदान म्हणून २ हजार २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार १०३ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.
आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी २७ हजार १६७ कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर ३८ हजार ५९ कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत. केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने १० हजार ५९ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी १५ हजार ६४८ कोटी, राज्यातील कृषिपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कामध्ये सवलत, सामूहिक प्रोत्साहन म्हणून ९ हजार २५० कोटी, केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी ५० वर्ष बिनव्याजी विशेष कर्ज सहाय्य योजनेंतर्गत ४ हजार ४३९ कोटी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी केंद्र आणि राज्य हिस्सा म्हणून३ हजार ५०० कोटी, परिवहन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील विविध खर्चासाठी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास विशेष अर्थसहाय्य म्हणून २ हजार ८ कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३०० तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी ४०० कोटी रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचा हवाई प्रवास आणि अनुषंगिक खर्चासाठी १४३ कोटी तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी २० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.
पुरवणी मागणीतील विभागनिहाय तरतुदी
महसूल आणि वने….१५ हजार २७१ कोटी
उद्योग, ऊर्जा, कामगार…..९ हजार २०५ कोटी
नगरविकास….. ९ हजार १९५ कोटी
सार्वजनिक बांधकाम ….६ हजार ३४७ कोटी
महिला आणि बालविकास…..५ हजार २४ कोटी
नियोजन……४ हजार ८५३ कोटी
गृह…………३ हजार ८६१ कोटी
सार्वजनिक आरोग्य…..३ हजार ६०२ कोटी
जलसंपदा……३ हजार २२३ कोटी
