Breaking News

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, कोणी सांगत असेल… तर काहीतरी गडबड… उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालाचा अत्यंत महत्वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याप्रकरणी माहिती दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, या देशात लोकशाही आहे की नाही? हा देश विधानसभा आणि संसद संविधानानुसार चालल्या आहेत की नाही, काम करताहेत की नाही, सर्वोच्च न्यायालय, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कोणाच्या दबावाखाली काम करतंय, याचाही फैसला उद्या लागेल.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल राजकारणात या गोष्टी घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल. पाकिस्तानात तुम्हाला आज संविधान जळताना दिसतंय कारण पाकिस्तानसारखं राष्ट्र आपलं दुश्मन राष्ट्र असलं तरीही ते जळतंय. कारण ते संविधानानुसार चाललं नाही. विरोधकांवर सुडबुद्धीने कारवाया होत आहेत. सरकार पाडली जातायत, सरकारं आणली जातायत. न्यायव्यवस्था विकली गेली, हे चित्र या देशात असू नये. यासाठी उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतीवीरांनी, स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आहे. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानसुद्धा आहे. त्यांच्या रक्षणासंदर्भातील निर्णय उद्या येईल, त्यामुळे आम्ही आशावादी आहेत, असं स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असाच दावा केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, न्यायालयाच्याबाबतीत कोणी सांगत असेल की आम्हीच जिंकणार तर त्यांनी काहीतरी गडबड केली आहे. पण मला अजूनही खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत