Marathi e-Batmya

नाशिकमध्ये तांबे विजयाकडे तर अमरावतीत भाजपा पराभवाच्या छायेत, औरंगाबाद मविआकडे

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी झालेल्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या नागपूर, अमरावती येथील जागा हिसकावून घेण्यात चांगल्यापैकी यश मिळविल्याचे दिसून येत आहे. तर नाशिकमध्ये भाजपाच्या पाठिब्यांवर लढत असलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव होणार असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादची जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.

अमरावतीत विद्यमान आमदार डॉ.रणजीत पाटील यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर नाराजी असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद पणाला लावत डॉ.रणजीत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगाडे हे उभे आहेत. आतापर्यंत आलेल्या मतांच्या आकडेवारीनुसार संध्याकाळपर्यंत पाटील आणि लिगाडे यांच्या फक्त १ हजार मतांचा फरक होता. मात्र रात्री उशीरा या दोघांच्या मतांच्या आकड्यांमध्ये २ हजारांचा फरक पडला. विशेष म्हणजे डॉ. रणजीत पाटील यांच्या पेक्षा धीरज लिगाडे हे २ हजार मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अमरावतीची जागा भाजपाच्या हातातून सुटण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे डॉ पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जूनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी आधी असलेल्या भूमिकेत बदल करत जूनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मतदारांना दिले. मात्र मतदारांना फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास बसला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

तर दुसऱ्याबाजूला भाजपाच्या मातृसंस्था असलेल्या नागपूरात भाजपाचे उमेदवार ना.गो. गाणार यांचा निम्याहून अधिक मतांनी पराभव करत महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. त्यामुळे नागपूरची जागा भाजपाच्या ताब्यातून हिसकावून घेण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाल्याचे दिसते.

तसेच नाशिकमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना अखेरच्या क्षणी भाजपाने पाठिंबा देत आपलंस केले. तर तांबे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहिर केले. मात्र शुभांगी पाटील या पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. तर सत्यजीत तांबे हे विजयाच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

तर कोकणात शिंदे गटाने पहिल्यांचा आपले खाते उघडले असून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव करत भाजपा-शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत.
त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गट २ जागी तर महाविकास आघाडी ३ जागी विजय मिळवित असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version