Marathi e-Batmya

बुलढाण्यात शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्त्ये भिडले: १५ मिनिटे चालला राडा

बंडाचे निशाण फडकाविल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटाकडून आतापर्यंत एकमेकांवर टीकेपुरतेच राहिले होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही पूर्वीप्रमाणे कोणीही काही करू नका त्यांना जे करायचे ते करू द्या सांगत मला रक्तपात नको असे सुरुवातीलाच जाहिर केले होते. त्यामुळे आतापर्यत शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून फक्त एकमेकांवर टीकाच केली जात असे. मात्र आत बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा राडा झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज करत जमावाला पांगवावे लागले.

आज बुलढाणा बाजार समितीत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, कार्यक्रम सुरु झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्त्ये या कार्यक्रमात घुसले. गायकवाड यांच्या मुलासह कार्यकर्त्यांनी घुसून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या उपस्थितीतच हा राडा सुरु झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाकडूनही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्त्ये असल्याचे सांगत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातच शब्दाला शब्द वाढत गेल्याने दोन्हीकडील कार्यकर्त्ये एकमेकांना भिडले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगविले.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. यासंदर्भात अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदेगटातील सैनिकांनी पोबारा केला.

Exit mobile version