Marathi e-Batmya

एक होता धुरंधर… . .अजित दादा पवार

रहने को सदा दहर में आता नही कोई।

दादा, तुम जैसे गए ऐसे भी जाता नही कोई।।

स्वर्गीय अजितदादांच्या पहिल्या जयंती निमित्त करावयाच्या कार्यक्रमाच्या  नियोजनाबाबत चर्चा कानावर आली आणि मन सुन्न झाले. दादांचा अतिदुर्देवी अपघाती मृत्यू निशब्द करणारा होता.  त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणातील विकासाचा झंझावात संपत चालल्याची चाहूल लागली आहे. दादांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळाच्या ओघात विस्तारत असल्याची जाणीव अधिक तीव्र झाली. जयंतीच्या चर्चांमुळे  दाहकता अधिकच आणि मन पिळवटून टाकणारी होती.  ​आपल्याला मिळालेल्या प्रत्येक श्वासातून दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जिवाचे रान केले.  नियतीने इतक्या मोठ्या संख्येने उरलेले श्वास अचानक हिरावून घेतले. आजच्या राजकारणात दांभिक, नाटकी, कुटील पुढाऱ्यांचे पेवच फुटले आहे.  नेता आणि पुढारी म्हटलं की थापा मारणारं, गोड बोलणारं, भडक, दिखाऊ, प्रसिद्धीला हपापलेले, आवर्जून कार्यक्रमस्थळी बैठकांना उशिरा येणारं, एक जात रसायन. अशा राजकारण्यांत आपलं वेगळेपण अगदी नैसर्गिकरित्या आणि दृढतेने जगणारा दादा म्हणजे राजकारणातील एक मुलखावेगळं रसायन होतं.  कठीण प्रसंगात अधिक तेजाने तळपणारं धुरंधर नेतृत्व होतं.

​मी मंत्रालयात कक्षाधिकारी या पदावर कृषि विभागात काम करत असताना एखादया मंत्री महोदयांच्या वैयक्तिक आस्थापनेवर जाण्याची खूप इच्छा होती.  अगदी राज्यमंत्री महोदयांकडे रूजू होऊन वेगळया कामाचा अनुभव घ्यावा या दृष्टीने प्रयत्नरत असताना अचानक मला कै. दादांच्या आस्थापनेवर ‘स्विय सहाय्यक’ म्हणून नियुक्ती मिळाली. साध्या कंपनीत अनुभव घेऊ म्हणत असताना एकदम मोठ्या नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्याची संधी मिळावी तसा आनंद झाला. मात्र दादांच्या लष्करी शिस्तीचे, तापट स्वभावाचे आव्हान पेलण्यासाठी प्रोबेशन पिरियड मात्र माझ्यासाठी लष्करी प्रशिक्षणासारखाच खडतर होता. त्यानंतर मी सन मे २००५ ते सप्टेंबर २०१४ असा नऊ वर्षांहून अधिक काळ दादांचा स्विय सहाय्यक, ओ.एस.डी., खाजगी सचिव अशा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होतो. अत्यंत जवळून दादा हे रसायन समजायला याची खूप मदत झाली. बाहेरून फणसासारखं दिसणारं हे व्यक्तिमत्त्व अंतरंगाने एक संवेदनशील, प्रेमळ असल्याची मनोमन खात्री झाल्याने नंतरचा दादांसोबतचा सहप्रवास विनासायास  झाला.

दादा हे राजकारणातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. जेवढे दादा सर्वसामान्यांना उमजले त्यापेक्षाही ते खूप महान आणि उत्तुंग होते. आदरणीय साहेबांचा वारसा म्हणून राजकारणात आले तरी कितीतरी परीक्षा देऊन, चक्रव्यूह भेदून, विष पचवून त्याचं व्यक्तिमत्त्व स्वकर्तृत्वावर सिद्ध झालेले होतं. फटकळ, स्पष्टवक्ते, सडेतोड बोलणारे, ही दादांची एकेकाळची दूषणे होती. मात्र तीच दादांची नंतर आभूषणे बनली.  दादांच्या मनाचा नितळपणा, सच्चेपणा यामुळे ते शक्य झाले. राजकारणात दिलेली आश्वासनं किंवा शब्द मुळी पाळण्यासाठी नसतातच असा एक अलिखित दंडक आहे. मात्र त्यांना कितीही त्रास झाला, प्रसंगी राजकीय नुकसान झाले तरी दिलेला शब्द पाळताना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या या वचनबध्दतेतूनच इद्रिस नायकवाडी, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी यांच्यासारख्या अनेक कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नसलेल्या साध्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला.  “जो पुरे करे वादा उसका नाम अजितदादा” हे तंतोतंत खरे होते. दादा वेगवेगळ्या सभांमध्ये, बैठकांमध्ये भाषणादरम्यान जी आश्वासने देत ती तंतोतंत पणे पाळली गेलीच पाहिजे. त्यासाठी आमच्या कार्यालयात एक काटेकोर पाठपुरावा प्रणाली दादांच्या मार्गदर्शनातून तयार झाली होती.  प्रत्येक आश्वासने पूर्णत्वास जाण्यासाठी दादा स्वत:ही त्याचा आढावा घेत.  कधी कधी वित्तीय तुटीमुळे किंवा राजकीय अडचणीमुळे आश्वासने पाळणे अवघड होत आहे असे दिसल्यावर दादा स्वत: ॲक्शन मोडमध्ये यायचे  आणि ते पूर्णत्वास न्यायचे.

दादांनी भल्या पहाटे कामाला सुरूवात करण्यात नेहमी धन्यता मानली. आपल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती येथील विकास कामांची पहाणी ताबडं फुटायच्या  आतच पूर्ण व्हायची. अधिकाऱ्यांची मात्र रात्रीबरोबर पहाटेची झोपही वाया जायची. सर्वसामान्यांना दादांचे दरवाजे सकाळी सातपासून खुले असायचे. कोणाच्याही मध्यस्थीशिवाय थेट उपमुख्यमंत्री यांना भेटून काम मार्गी लागू शकते हा विश्वास फक्त दादांच्या दरबारातच शक्य होता. कामाशी संबंधित अधिकाऱ्याला सकाळी सातपासून दादांच्या फोनचा सपाटा सुरू व्हायचा. अनेक अधिकारी बेडवरून खडबडून जागे व्हायचे. कधी कोणी जिममध्ये, कोणी बाथरूममध्ये तिथेच त्यांना दादांच्या सूचनांची दखल घ्यावी लागायची. एकदा एका पदाधिकाऱ्याचे एम.आय.डी.सी.  संदर्भातील काम होते. भूषण गगराणी साहेब तेव्हा एम.डी. होते. साडेसात ते नऊ या वेळात त्यांना सर्व ३-४ पी.ए., ऑपरेटर सारखे फोन ट्राय करत होते. या काळात ७८ मिस कॉल पडल्याचे त्यांनी मला नंतर खाजगीत सांगितले होते. काम पूर्णत्वास नेण्यासाठी दादांची तगमग किती असेल हेच यावरून लक्षात येते.

​दादांची सतरा – अठरा तास काम करण्याची तयारी असे. मंत्रालयात असताना बैठकांचा सपाटा, अपॉइंटमेंट याचा धडाका असे. मोकळा वेळ असला की ते बेचैन व्हायचे. बऱ्याचदा दादांना पूर्णवेळ खऱ्या अर्थाने मिनिट टू मिनिट बिझी ठेवणारे दैनंदिन कार्यक्रम आखताना आमची खूप पंचायत व्हायची. कारण दादा कामवेडा माणूस होता. लोकांत रमणारा माणूस होता. लोक नसली, मोकळा वेळ असला की ते बेचैन व्हायचे. अर्थात एखादा कार्यक्रम, बैठक रद्द झाली तरी त्यांचा लगेच दुसरा प्रॉडक्टिव्ह कार्यक्रम तयार असायचा.  आराम हा दादांनी कायमचा हद्दपार केला होता.  प्रत्येक क्षण लोकांसाठी कामी लागला पाहिजे हा त्यांचा आग्रह असे.  मरगळ, कंटाळा, बैठक किंवा कार्यक्रम रेंगाळणे हे मला दहा वर्षात जवळून काम करताना अक्षरश: एकदाही आढळले नाही.   मी दादांबरोबर राज्यभर गाडीने फिरलो.  गाडीत बसलो कि दादांचे ऑफिस सुरू व्हायचे.  पुर्वीच्या कार्यक्रमाची  दिलेली कागदपत्रे चाळणे, मला सूचना करणे, फोन लावून देणे.  कधीकधी महत्वाच्या कामासाठी अधिकारी-पदाधिकारी किंवा कार्यकर्ता याला गाडीत बसवायचे.  शांतपणे गाडीत कामाची चर्चा व्हायची.  मोठे निर्णय व्हायचे.  दादांच्या बैठका म्हणजे टू द पॉईंट आणि पक्का निर्णय.  काटेकोर वेळेत बैठका घेणारे दादा कदाचित एकमेव मंत्री होते.  सार्वजनिक कार्यक्रमातही तोच खाक्या.  कुठे कार्यक्रम रेंगाळणार आणि लांबणार असे वाटले की दादा थेट माईक हातात घेऊन आपले भाषण संपवून काटेकोर वेळेत कार्यक्रम स्थळावरून रवाना व्हायचे.  दिलेले कार्यक्रम आपल्याकडून झालेच पाहिजे याची दक्षता दादा घ्यायचे.  एकदा दादांना अचानक मुंबईला पक्षाच्या बैठकीला जावे लागणार होते.  संध्याकाळी सहाच्या हडपसर येथील पॅथॉलॉजिकल लॅब उद्घाटनाचा कार्यक्रम तीनला घेण्याचे दादांनी आयोजकांना दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कळवले.  आयोजकांची खूप दमछाक झाली.  मात्र पक्षाची महत्वाची बैठक असतानाही दादा कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आले,  ही कृतज्ञतेची भावना आयोजकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

दादा स्वभावाने स्पष्टवक्ते होते. न होणाऱ्या कामाला नाही म्हणण्याचे त्यांचे धारिष्टय कमालीचे होते.  काही काळ अर्जदाराला वाईट वाटायचे पण नंतर त्यालाही उपरती व्हायची.  दादा भेटायला येणाऱ्या माणसांचा फक्त कागद वाचायचे.  तो कोणत्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा याचे त्यांना काही घेणेदेणे नसायचे.  खरोखरच योग्य काम असले की ते मार्गी लागणारच.  बारामतीचे काम बारामतीत असताना, पुण्याचे काम पुण्यात आणि मंत्रालयातील काम मंत्रालयातच सांगितले गेले पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता. त्यात कोणी चूक केली की मात्र त्याची खैर नाही. एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला दुखावल्याचे दादांना लक्षात आले की आम्हाला फर्मान सुटायचे. “शोधा त्याला, घेऊन या माझ्याकडे.” मग आमची शोधाशोध करता करता दमछाक व्हायची.   नंतर दादा आणि त्यांच्यातील संवाद कमालीचा भारी असायचा.  त्यांचे काम मार्गी लागायचे त्यामुळे दादा रागावले की काम होणारच असाही एक ठोंकताळा झाला होता.  दादांचा  जनता दरबार खूप जवळून वर्षानुवर्षे मी पाहिलाय. विषयाचे ज्ञान, नेमक्या अधिकाऱ्याला नेमकेपणाने सांगणे.  यामुळे सर्वसामान्यांचे खूप प्रश्न मार्गी लागत. एखाद्या बैठकीला संबंधित खात्याचा मंत्री, सचिव, आयुक्त दर्जाचा अधिकारी आला की त्यांच्याकडे त्यांच्याशी संबंधित बैठकीच्या विषयाव्यतिरिक्त असलेल्या इतर कामाची आठवण करून देणेबाबत दादांच्या स्टँडिंग ऑर्डर्स आम्हाला असायच्या.  महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचे दादांचे असे अनेक  प्रशासकीय अंगभूत कसब वाखाणण्यासारखे होते.

​दादांचे प्रशासकीय कसब व कामाचे मॅनेजमेंट जबरदस्त होते. विषयांचे असलेले ज्ञान आणि गाढा अनुभव याची जोड देऊन जटिल समस्याही तडीस नेण्यात त्यांचा हातखंडा होता.  खऱ्या अर्थाने दादा म्हणजे जटिल समस्यांवरचे ब्रम्हास्त्र होते.  प्रश्न सोडवण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे यावर त्यांचे लक्ष असायचे.  यामुळे फार मोठी विकासाची कामे त्यांच्या हातून झाली.  सहकार, शिक्षण, बँकिंग,क्रिडा आणि मंत्रालयीन प्रशासन यातील त्यांचा व्यासंग दादांचे अष्टपैलूच सिध्द करणारा होता. प्रत्येक काम हे आपल्या स्वत:च्या घरातील कामाइतकेच महत्वाचे मानायचे.  विकास कामांचे आर्किटेक्चर डिझाईन कसे असावे, लँड स्केपिंग कसे असावे, कुठल्या रंगाच्या टाईल्स, बिल्डींगला कोणता रंग, परिसरात कोणती झाडे लावायची अशा अनेक छोटया छोटया मायक्रोप्लानिंगमध्ये दादा लक्ष घालायचे.  कामाचा दर्जा, गुणवत्ता यावर व्यक्तिश:  खूपच काटेकोर लक्ष असायचे.  जे निर्माण कराचे ते देखणे आणि भव्य दिव्य!  त्यांची सौंदर्यदृष्टी कमालीची होती.  इतरांसाठी मॉडेल ठरावे अशा अनेक देखण्या सुंदर सर्व सोयींनी युक्त विकासकामांची निर्मिती दादांकडून झाली हे खूपच कौतुकास्पद होते.  वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता दादांसाठी तितकीच महत्वाची. दादांचे केस कधी पांढरे चमकले, भांग व्यवस्थित नाही, कपडे काहीशे चुरगळले आहेत, आज दाढी केलेली नाही असे एका क्षणासाठीही मला कधी दिसले नाही.  एवढा व्याप आणि धावपळीतून वैयक्तिक टापटिपपणासाठी कसा वेळ काढायचे ते त्यांनाच ठाऊक. दादांचे आहारावरही प्रचंड नियंत्रण होते.  आठवडयात चार दिवस दौऱ्यावर राहत असल्याने आहारात साध्या, चौरस आहारावरच त्यांचा भर असे.  नाष्टयात, जेवणात काय काय असावे हे आम्ही आयोजकांना दौऱ्याआधीच कळवत असू.  सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसल्याने दादांचे शरीरमान एकदम धडधाकट होते.

दादा हे कोणाचे ऐकत नाही.  एककल्ली आहेत हा धादांत खोटा आरोप त्यांचावर नेहमी होतो.  प्रत्येक अर्जदाराच्या कागदातून येणाऱ्या तक्रारी, सूचना हे दादांसाठी इनपूट्स असत.  एवढया मोठया संख्येने येणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येक कागद वाचणारे दादा होते. स्वर्गीय पिचड साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. एकदा पिचड साहेबांनी आणि मी प्रांजळपणे दादांना सांगितले कि दादा आपण राज्यभर फिरता पण पक्ष कार्यालयात आपण स्वत:  आणि राष्ट्रवादीच्या सर्वमंत्र्यांनी आठवडयातून किमान चार तास राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून हजेरी लावली पाहिजे.  कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक, सार्वजनिक आणि पक्षाच्या समस्या मार्गी लावल्या पाहिजे.  त्यानंतर दादांनी  गुरुवारी पक्ष कार्यालयात जनता दरबार घेतला.  आपल्या सहकार्यांनाही सूचना दिल्या.  काम रात्रंदिन, मात्र प्रसिध्दी आणि चमकूगिरीपासून दादा कोसो मैल दूर.  आपण सर्वसामान्यांचे सेवकच आहेात. ईश्वराने दिलेल्या संधीचा आपण त्यांना लाभ करून दिला पाहिजे. आपण आपली जबाबदारी, कर्तव्य पार पाडतो मग त्याचा ढिंढोरा कशाला पिटायचा हा दादांचा  स्ट्रेटफॉरवर्ड विचार. मात्र त्यामुळे आमच्या दादांचे विशाल रूप  काही प्रमाणात अप्रकाशितच राहिले. आणि या उलट गोबेल्स नीतीने विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला मात्र नको तेवढी प्रसिद्धी दिली गेली. मात्र दादा तसूभरही विचलित झाले नाही. आपल्या कामातून आणि प्रामाणिकतेतून त्यांनी उत्तर दिले.

​दादा हे सर्व नेत्यांपेक्षा कसे वेगळे आणि धुरंधर आहेत आणि कठीण प्रसंगी दादांचे नेतृत्वगुण कसे उजळून वर येतात हे करोना काळातील दादांच्या कामावरून दिसले. सर्व रस्ते सुन्न, सर्व केबिन्स बंद अशा त्या भीतीप्रद वातावरणात दादांची आणि अपवादात्मक काही सन्माननीय अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या गाडया मंत्रालयात यायच्या.  सर्वत्र सन्नाटा असताना दादा मोजक्यांसोबत रोज बसून संपूर्ण राज्याला करोनाच्या महाकाय राक्षसापासून वाचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत होते. दादांना करोनाची लागणही झाली होती. मात्र त्यातून सुखरूप बाहेर पडून पुन्हा जोमाने काम सुरू ठेवले. कठीण प्रसंगी धीरोदात्तपणे काम करण्याच्या नेतृत्वाचा, कसोटीचा असाच प्रसंग मंत्रालयाला आग लागल्यावरही आठवतो. सर्व मंत्री महोदय, उच्च अधिकारी पसार झाले असताना दादा मंत्रालयाच्या मैदानात खाली थांबून अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना , आगीत अडकलेले यांना धीरोदात्तपणे, तळमळीने सूचना करत होते.   कार्यकर्ता वाकला नाही तर वाकवायचा हा अहंकारी बाणा आजच्या नेत्यांमध्ये आढळतो. मात्र दादांच्या शासकीय निवासस्थानी लावलेली “कोणीही अजितदादांच्या पाया पडू नये” ही पाटीही दादांचे वेगळेपण दाखवते.  दादांची भाषणं म्हणजे इतर नेत्यांसारखी गोड-गुलाबी आणि आभासी असण्यापेक्षा किंवा भावनिक अपिलापेक्षा परखड वस्तुस्थिती, प्रसंगी यंत्रणेतील दोषांवर चाबकांचे फटकारे, धोरणात्मक स्पष्टता याने ओतप्रोत भरलेली असायची.

दादांचे विकासाचे व्हिजन काय ते पाहण्यासाठी बारामती, पिंपरी-चिंचवड, दादांच्या बँका, शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने  त्यांनी मंत्री म्हणून हाताळलेले प्रशासकीय विभागांतर्गत झालेली कामे यांची विकासवारी खरंच केली पाहिजे. एकटा माणूस विकासाच्या अनेकविध क्षेत्रांत एवढं मोठं, देखणं, प्रचंड काम उभ करू शकतो यावर खरंच विश्वास बसत नाही. अठरा-अठरा तास काम करण्याची तयारी, निर्णयक्षमता, विकासाची दिव्यदृष्टी, करारी बाणा, धाडसी प्रवृत्ती आणि याउपर प्रत्येक क्षण विकासाचे चिंतन यामुळेच हे होऊ शकले.

दादांना आदरणीय पवार साहेबांबद्दल आंतरिक जिव्हाळा, आदर आणि कृतज्ञतेचा अंतःकरण पूर्वक भाव होता. ते नेहमी बोलण्यातून, व्यक्त होण्यातून जाणवायचा. साहेब केंद्रात तर दादा महाराष्ट्रात अत्यंत आत्मीयतेने सर्व आघाड्यांवर नेतृत्व करत होते. तथापि त्यासाठी त्यांनी अक्षरशः जिवाचे रान करून साहेब व समस्त जनतेच्या कसोटीला उतरले होते. तथापि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना दादा साहेबांशी सल्लामसलत करायचे. एखादा निर्णय ठामपणे घेतल्यावर साहेबांकडून काही वेगळा निर्णय आला तर अत्यंत आणि तो स्वतःच्या इच्छेविरुद्ध असला तरी दादा साहेबांचेच आदेश पाळायचे. साहेब म्हणजे दादांच्या हृदयातील हळवा कोपरा होते. साहेबांचा विषय आला की नेहमी दादांच्या बुद्धीवर भावनेने मात केलेली मी नेहमी पाहिले आहे.   आदरणीय काकींबद्दल दादांना विशेष आत्मीयता होती.

​सुप्रियाताईंबद्दल दादांच्या भावना या नेहमी भावा-बहिणीच्या नात्यातील एकोपा, सामंजस्य, मायेचा ओलावा असेच राहिले आहे. जेव्हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी दादांना साहेबांपेक्षा वेगळा निर्णय घ्यावा लागला तेव्हा दादांच्या जिवाची झालेली घालमेल, तगमग मी जवळून पाहिली आहे.

माझ्या वैयक्तिक जीवनावर दादांचा खूप प्रभाव आहे. दादांबरोबर महाराष्ट्र फिरलो. शेकडो वेळा विमान, हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचे भाग्य मिळाले. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची भर पडली.  दादांनी माझ्या कोतुळ गावाला पिण्याच्या पाण्याची योजना दिली. आज माझा कोतुळ आणि परिसर पिंपळगाव खांड धरणाच्या माध्यमातून बारामाही झाला तो केवळ आणि केवळ दादांमुळेच. माझ्या प्रत्येक अनेक सार्वजनिक कामांना न्याय दिला. दोन वेळा माझ्या रिमोट गावात माझ्या घरी येऊन गेले.  एकदा निवडणूक प्रचार सभेसाठी आले तेव्हा आणि दुसऱ्यांदा माझ्या वडिलांचे दु:खद निधन झाल्यावर सांत्वन करण्यासाठी.  दादांच्या वैयक्तिक आस्थापनेवर नव्हतो तेव्हाही दादांचे दरवाजे मला नेहमी खुले होते. माझ्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या स्मृती मी चिरंतन हृदयात जतन करून ठेवेन.

​दादांनी निर्माण केलेले विकासाचे मॉडेल्स भविष्यातही साकारण्यासाठी दादांनी कामाची जी एक प्रणाली  व पद्धती विकसित केली होती त्याचा अंमल केला पाहिजे. दादांच्या दिनचर्चेचा, कामाच्या स्टाईलचा बारकाईने अभ्यास करून ती जास्तीत जास्त प्रमाणात अंगिकारण्याची जबाबदारी दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे.  ​आदरणीय उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्रावाहिनी यांना खानदानी वारसा आहे. पर्यावरण संवर्धन, ग्रामस्वच्छता, ॲग्रो टुरिझम, टेक्सटाईल पार्क यांच्या माध्यमातून दादांच्या विकासकामांना समांतरपणे त्यांनी मतदारसंघात आणि राज्यभर साथ दिलेली आहे. आदरणीय खासदार पार्थदादा हा सिंहाचा छावा आहेत. त्यांच्यात दादांचा करारीपणा, धमक दिसते. पार्थदादांच्या अविरत कष्टांतून पुन्हा अजितदादा अवतरल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.  हा आशावाद सर्व दादाप्रेमींना  आहे.   अजितदादा अमर रहे या घोषणा दादांच्या अंत्यविधीला दिल्या गेल्या आणि पहिल्या जयंतीलाही दिल्या जातील.  मात्र महाराष्ट्राच्या विकास पुरुषाने आपल्या लष्करी शिस्तीतून, प्रशासकीय कौशल्यातून, अविरत कष्टातून उभारलेले विकासपर्व आगामी काळातही नव्या रूपात अवतरावे आणि त्या विकास कामांतून दादांना अश्वात्थाम्याचे अमरत्व प्राप्त व्हावे, अशी विकासाची आस्था असलेल्या प्रत्येकाची भावना आहे.  आणि म्हणूनच  सर्वसामान्य नेत्यांसारखे भावनिक आणि काळाच्या ओघात विरणारे अमरत्वापेक्षा वास्तविक, वस्तुनिष्ठ, चिरंतन अमरत्व दादांना लाभणे, ही आजच्या महाराष्ट्राची खरी गरज आहे.

​ स्वर्गीय दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त दादांना अंतःकरणपूर्वक विनम्र अभिवादन!!

Exit mobile version