आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या करावी लागली. साहिलवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, यातूनच साहिलला टोकाचे पाऊल उचलावे लागले. साहिलच्या आत्महत्येस प्रा. सत्यनारायण दुल्ला हेच जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी व सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केली.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना उदय भानू चिब पुढे म्हणाले की, साहिलच्या प्रकरणात आणखी एक प्रा. केदारे यांचीही महत्वाची भूमिका आहे, त्यांनाही अटक करा, जोपर्यंत या दोन प्राध्यापकांना अटक केली जात नाही तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही. संस्थाच संस्थेतील घटनेची चौकशी करेल तर ती निष्पक्ष कशी असेल. साहिल वाकोडे याच्या आधी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मागील सात महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. साहिलचा लॅपटॉप, मोबाईलसह इतर सर्व गॅझेट क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहेत. त्यातील डेटा तातडीने पालकांना द्यावा. जोपर्यंत साहिलला न्याय मिळत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरुच राहिल असे सांगितले.
उदय भानू चिब पुढे म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले तसेच साहिलला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष लढा देईल. साहिलला न्याय देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल असे आश्वासन दिल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, साहिल हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता, त्याच्यावर कॉपी केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. पहिल्या बेंचवर बसून कोणी कॉपी कसे करेल. संस्थेने कोणतीही चौकशी न करता आरोप केला व नंतर ते विधान मागे घेतले व माफीही मागितली. आयआयटी पवईमध्ये जातीवरून छळ केला जात असल्याचे अनेक विद्यार्थी तक्रार करत आहेत पण आता या विद्यार्थ्यांना बोलू दिले जात नाही, करिअर खराब करण्याची धमकी दिली जात आहे, त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, कॅम्पसच्या बाहेरही त्यांना जावू दिले जात नाही, असे सांगितले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आदी उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांच्यासह युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबईचे सहपोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन संबंधित लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
