रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून, या स्मारकासाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
याबाबत सदस्य प्रमोद जठार लक्षवेधी सूचना यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार येईल.
राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून, सुमारे ३५० कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
