Marathi e-Batmya

संजय राऊत यांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंनी सांगितल असत तर….

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर टीका करणं टाळावं, असा सल्ला दिला. संजय राऊत यांनी दिलेल्या सल्ल्यावर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत संजय राऊत यांना उपरोधिक टोला लगावला.

याबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारलं असता ते म्हणाले, हा सल्ला जर उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी मानला असता, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत ते पुढे म्हणाले, इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होतं. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही, असे सांगत संजय राऊत यांच्या सल्ल्याला उडवून लावले.

भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थराला जाऊ शकते. भांडण लावणे, मतभेद निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केली.

नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही असं विधान केलं होते. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमची युती ही फक्त शिवसेनेशी झाली आहे. वंचित आघाडीच्या महाविकास आघडीतील प्रवेशासाठी उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत, असे मोठे विधानही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केले.

Exit mobile version