Marathi e-Batmya

वंचित बहुजन आघाडीची सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात निदर्शने

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपटातील काही दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ती दृष्ट कट करण्याची सूचना केली. त्यातच पुण्यातील काही ब्राम्हण संघटनांनीही फुले चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृष्यांच्या विरोधात आक्षेप घेत आंदोलनेही केली.

दरम्यान आज महात्मा फुले यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील भिडे वाडा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात येत होता. त्यावेळी ओबीसी समाजाबरोबरच दलित चळवळीतील कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर या जयंती उत्सवात

सहभागी झाले होते. मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भिडे वाड्यातच सेन्सॉरच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

दरम्यान महात्मा फुले यांचा सातत्याने अपमान करण्यात येत असताना इतर राजकिय पक्षांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, “कारण महात्मा फुले हे ओबीसी होते. जर ते मराठा असते तर काँग्रेस, शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) रस्त्यावर उतरले असते. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई माळी जातीच्या (उत्तर भारतातील सैनी जातीच्या) होत्या आणि म्हणूनच महाविकास आघाडी त्यांच्या अपमानाचा निषेध करत नाही अशी टीका केली.

Exit mobile version