Marathi e-Batmya

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरूवारी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. याआधी आठ जूनला यासाठी मतदान होणार होते. परंतु, कपिल पाटील आणि निरंजन डावखरे यांनी उन्हाळी सुट्टी असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. ती विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली. त्यानंतर आज नव्या तारखांसह या निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून ७ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ८ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. ११ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि २८ जून रोजी मतमोजणी होईल, असे आयोगाने जाहीर केले आहे.
मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत, मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून जनता दल युनायटेडचे कपिल पाटील, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अपक्ष डॉ. अपूर्व हिरे यांची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत असल्यामुळे या निवडणुका होत आहेत.

भाजपाचे तीन उमेदवार जाहीर

शिक्षक मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या शिक्षक परिषद,  या संघटनेच्या उमेदवाराला भाजपा पाठिंबा देत असे. यावेळी पहिल्यांदाच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंग देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. अनिलकुमार राजेसिंग देशमुख हे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आहेत. मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात गेली २७ वर्षे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करत आहेत. अनिकेत विजय पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रवक्ते आहेत तसेच संजय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे माजी खासदार विजय नवल पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. गुरूवारीच भाजपाने पक्षात दाखल झालेल्या निरंजन डावखरे यांची कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. डावखरे याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार होते.

Exit mobile version