मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यास एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना मतदारसंघातील विकास कामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी विविध विभागांकडून वित्त विभागाकडे धाव घेण्यात येत आहे. तर वित्त विभागाकडून ८० टक्के पर्यंतचा निधी या विभागांना देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्याचा अर्थसंकल्प नुकताच विधिमंडळात सादर करण्यात आला. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर वित्त विभागाकडून सरकारच्या अखत्यारीत असलेल्या जवळपास सर्वच विभागांना पुढील ८ महिन्याच्या खर्चासाठी ६० टक्के पर्यंतचा निधी देवून टाकला. परंतु निवडणूकांना अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक असताना मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधीची कमतरता भासू नये यासाठी ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अनेक विभागानी जास्तीचा निधी वित्त विभागाकडे मागितला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याअनुषंगाने रिलीज केलेल्या ६० टक्के निधीपैकी जास्तीचा निधी हवा असल्यास आणखी 2० टक्के निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही वित्त विभागाने दर्शविली आहे. यासाठी रितसर राज्य सरकारकडे संबधित विभागांनी प्रस्ताव पाठविल्यास वित्त विभागाकडून तातडीने मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूका आहेत, कामांसाठी ८० टक्के पर्यंतची रक्कम रिलीज करा
