Marathi e-Batmya

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्याअसून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.

११ मे ते १७ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांमध्ये एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरमध्ये ३३ शासकीय तर ६६९ खासगी टँकरचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडू लागल्याने अनेक ग्रामीण भागांमध्ये टँकर हा नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार ठरत आहे.

ठाणे विभागात सर्वाधिक १७७ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी एकूण २४४ टँकर कार्यरत असून राज्यातील सर्वाधिक टँकर या विभागात वापरण्यात येत आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सध्या कोणत्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून टँकर पुरवठ्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा वापर, विहिरींचे अधिग्रहण आणि जलसाठ्यांचे नियोजन यावरही भर दिला जात आहे.

आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version