Marathi e-Batmya

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाला खुले आव्हान, गुजरात आणि पंजाबमधील शाळांची तुलना करा

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी भाजपला पंजाब आणि गुजरातमधील १,००० शाळांची तुलना करण्याचे ‘खुले आव्हान’ दिले. त्यांनी असाही आरोप केला की, भाजप पंजाब सरकारच्या शाळांना बदनाम करण्यासाठी ‘बनावट, एआय व्हिडिओ’ वापरत आहे.

एका व्हिडिओ संदेशात, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही तुलना संयुक्तपणे केली पाहिजे आणि प्रसारमाध्यमांनी या उपक्रमाचे वार्तांकन करावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. भाजप गुजरातमध्ये ३० वर्षे सत्तेत आहे, तर ‘आप’ पंजाबमध्ये साडेचार वर्षे सत्तेत आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी भाजपला आव्हान देतो: तुम्ही गुजरातमध्ये ३० वर्षे सत्तेत आहात आणि आम्ही पंजाबमध्ये साडेचार वर्षे सत्तेत आहोत. मी तुम्हाला पंजाबमधील १,००० शाळांची यादी देतो आणि तुम्ही आम्हाला गुजरातमधील १,००० शाळांची यादी द्या. आपण एकत्र या शाळांची पाहणी करून पाहूया की कोणत्या शाळा अधिक चांगल्या आहेत, असेही सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी असा आरोप केला की, भाजप सरकारे स्वतःच्या शाळा सुधारण्याऐवजी पंजाबमधील शाळांची बदनामी करत आहेत. “केवळ साडेचार वर्षांत आम्ही पंजाबमधील शाळा इतक्या चांगल्या केल्या आहेत. पंजाबमध्ये सुमारे १९,७०० शाळा आहेत, त्यापैकी फक्त ५०० शाळा उरल्या आहेत. आम्ही उर्वरित १९,२०० शाळा खूप चांगल्या केल्या आहेत. त्या ५०० शाळांमध्येही काम सुरू आहे आणि पुढील दीड ते दोन वर्षांत त्याही सुधारल्या जातील, असेही यावेळी सांगितले.

अरविंद केजरीवाल असेही म्हणाले की, २०२२ मध्ये जेव्हा ‘आप’ पंजाबमध्ये सत्तेवर आली, तेव्हा राज्य २८ व्या स्थानावर होते, परंतु तेव्हापासून परिस्थितीत बदल झाला आहे. आम्ही एकट्याने शाळा सुधारल्या नाहीत; पंजाबच्या लोकांनी पंजाबच्या शाळा सुधारल्या. पंजाबच्या शिक्षकांनी त्या सुधारल्या, पंजाबच्या प्राचार्यांनी त्या सुधारल्या, पालक आणि मुलांनी — या सर्वांनी मिळून त्या सुधारल्या, असेही सांगितले.

अरविंद केजरीवाल यांचे हे वक्तव्य, पंजाब आणि गुजरातमधील शाळांची तुलना करण्याचे भाजपला दिलेले आव्हान, तसेच शिक्षण क्षेत्रातील पंजाब सरकारच्या कामाचा बचाव करणे आणि सरकारी शाळांना बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यावर केंद्रित होते.

Exit mobile version