Marathi e-Batmya

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव

विरोधी इंडिया गट मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे नेते गौरव गोगई यांनी सांगितले.  सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) इंडिया आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मोठ्या प्रमाणात मतदार चोरीचा आणि आयोग सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आणि निवडणूक आयोगाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कालावधी) कायदा, २०२३ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच आणि त्याच आधारावर मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकता येते.

याचा अर्थ, संसद दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमताने प्रस्तावाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकू शकते. प्रस्ताव स्वीकारण्यासाठी, किमान ५० सदस्यांनी त्याच्या बाजूने स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

विरोधी पक्षाकडे तो मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही. परंतु एका वरिष्ठ विरोधी नेत्याने सांगितले की, हा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वर्तनावर त्यांचा निषेध अधोरेखित करण्यासाठी आहे.

Exit mobile version