पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सामना कोलकाताच्या भवानीपूर मतदारसंघात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. त्यामुळे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एक रोमांचक लढत अपेक्षित आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्वतः या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना ही घोषणा केली. या निवडणुकीत ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा निवडणूकीसाठी उभ्या राहणार आहेत.
नंदीग्राममध्ये, जिथे सुवेंदू विद्यमान आमदार आहेत, तिथे तृणमूल काँग्रेसने भाजपाचे माजी पंचायत प्रमुख आणि माजी तृणमूल नेत्याचे निकटचे सहकारी पवित्र कर यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच कर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.
ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निष्ठावान असलेले सुवेंदू यांनी २०२१ मध्ये नंदिग्राम मतदारसंघात टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांचा जवळपास २,००० मतांनी पराभव केला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत परत येण्यासाठी भवानीपूरमधून निवडणूक लढवली. त्यांनी ही पोटनिवडणूक ५८,००० हून अधिक मतांनी जिंकली.
भवानीपूरमधून सुवेंदू यांना उमेदवारी देऊन भाजपाने ही लढाई ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात नेली आहे. २०११ पासून त्यांनी ही जागा तीन वेळा जिंकली आहे.
या जागेवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीच्या निराशाजनक कामगिरीमुळे भाजपला दिलासा मिळू शकतो. २०२४ मध्ये, भवानीपूर विधानसभा मतदारसंघात टीएमसीची आघाडी केवळ ८,२९७ मतांपर्यंत कमी झाली होती. तुलनेने, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्य २८,००० हून अधिक होते.
बंगालमधील सत्ताधारी पक्षाने लिंग आणि सामाजिक स्तरांवर व्यापक प्रतिनिधित्वावर जोरदार भर दिला आहे. पक्षाने ५३ महिला उमेदवारांसह, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील ९५ उमेदवार आणि अल्पसंख्याक समुदायांमधील ४८ उमेदवारांना उमेदवारी दिली. सत्ताविरोधी लाटेवर मात करण्यासाठी, पक्षाने ७४ विद्यमान आमदारांना तिकिट न देता नव्या उमेदवारांना तिकीट दिले.
तृणमूल काँग्रेस एकूण २९४ जागांपैकी टीएमसी २९१ जागांवर निवडणूक लढवणार असून, दार्जिलिंग जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आपला मित्रपक्ष भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा (बीजीपीएम) साठी सोडणार आहे.
यादी जाहीर करण्यापूर्वी, ममता बॅनर्जी यांनी भाजपाला आव्हान दिले आणि २२६ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी बंगालमधील नोकरशहा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही निशाणा साधला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “भाजपाचे आयोग पक्षाच्या सांगण्यावरून चांगला खेळ खेळत आहे. मात्र, भाजपाला कोणतीही संधी नाही. मागच्या वेळेच्या तुलनेत यावेळी तुमच्या जागा कमी होतील. ही पश्चिम बंगालच्या अस्तित्वाची लढाई आहे. बंगाल जिंकेल. ‘दिल्लीचा लाडू’ जिंकणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
उमेदवारांच्या यादीत राजकीय क्षेत्रातील दिग्गज, नवोदित आणि चित्रपटसृष्टीतील प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे.
अभिनेता सोहम चक्रवर्ती यांना करीमपूरमधून, तर आयपीएस अधिकारी प्रसून बॅनर्जी यांना मालदा येथील चंचलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
टीएमसीचे ज्येष्ठ नेते मदन मित्रा त्यांच्या बालेकिल्ला कामरहाटीमधून निवडणूक लढवणार आहेत, तर अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांना बारानगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
गायिका अदिती मुन्शी राजारहाट गोपालपूरमधून, तर झरना सरदार यांना संदेशखालीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी टीएमसी नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या साथीदारांवर जमिनी बळकावल्याचा आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाल्यानंतर २०२४ मध्ये संदेशखाली चर्चेत आले.
