Marathi e-Batmya

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, प्लायदुबई विमानातील त्या सह वैमानिकाचे धर्मांधीकरण झाले होते

तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (flydubai) विमानावर हवेत झालेल्या हल्ल्यात १८० प्रवाशांचे (ज्यांत प्रामुख्याने इस्रायली नागरिक होते) प्राण धोक्यात आले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला की, भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे (को-पायलट) कट्टरपंथी विचारसरणीनुसार धर्मांधीकरण झाले होते.

‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, त्या सह-वैमानिकाचे इराणशी काही संबंध होते का, हे तपासकर्ते “काही दिवसांतच” निश्चित करू शकतील.

अद्याप अधिकाऱ्यांनी त्या सह-वैमानिकाची ओळख उघड केलेली नाही; मात्र मिळालेल्या माहितीनुसार, तो ओमानचा नागरिक आहे. ‘फ्लायदुबई’चे विमान FZ1073 सौदी अरेबियातील तबुक येथे आपत्कालीन स्थितीत उतरवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

इस्रायल त्या सह-वैमानिकाची चौकशी करेल आणि इराणचा यात काही सहभाग आहे का याचा तपास करेल, असे सांगताना पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू ‘फॉक्स न्यूज’ला म्हणाले, “आम्ही या हल्लेखोराच्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ; त्याचे काही साथीदार होते का आणि यामागे इराणचा हात होता का, याचा शोध घेऊ. मला वाटते की आम्हाला हे लवकरच समजेल.”

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, “आम्ही या तपासावर लक्ष ठेवू आणि कदाचित त्यात सहभागीही होऊ,” असेही नमूद केले.

दुबई-तेल अवीव विमानात सह-वैमानिकाने वैमानिकावर केलेला हा रक्तरंजित हल्ला म्हणजे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न होता की दहशतवादी कृत्य, याचा तपास सध्या इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) करत आहेत.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमधील इस्रायलचे राजदूत योसी अब्राहम शेली यांनी घाईघाईने कोणताही निष्कर्ष न काढण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू  यांनी ‘फॉक्स न्यूज’कडे भाष्य करण्यापूर्वीच, माध्यमांमध्ये त्या सह-वैमानिकाच्या धार्मिक श्रद्धांबाबत चर्चा सुरू झाली होती. तेल अवीवमधील ‘चॅनेल १६’चे परराष्ट्र बातम्यांचे संपादक योसेफ इस्रायल यांनी ‘फ्लायदुबई’च्या एका वैमानिकाचा हवाला देत सांगितले की, आरोपी सह-वैमानिकाचे वर्तन “अत्यंत धार्मिक” होते.

“तो दिवसभर अतिप्रमाणात प्रार्थना करायचा आणि महिलांशी हस्तांदोलन करण्यास नकार द्यायचा,” असे त्या सहकाऱ्याने सांगितल्याचे योसेफ यांनी नमूद केले. मात्र, योसेफ यांनी त्या वैमानिकाची ओळख उघड केली नाही.

Exit mobile version