Marathi e-Batmya

भारताला युरेनियमच्या सुरळीत पुरवठा होण्याच्या अनुषंगाने उझबेकिस्तानसोबत चर्चा

भारत आणि उझबेकिस्तानने रविवारी आपले संबंध सर्वसमावेशक सामरिक भागीदारीपर्यंत उन्नत केले आणि दीर्घकालीन युरेनियम पुरवठा व्यवस्थेसाठी काम करण्यास सहमती दर्शवली. यासोबतच दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारातील प्रगतीची घोषणा केली. हा निर्णय दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आला आहे.

“या विशेष प्रसंगी, आम्ही आमचे संबंध सर्वसमावेशक सामरिक भागीदारीपर्यंत उन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन चौकटीत ठोस उद्दिष्टे निश्चित करून आम्ही पुढे वाटचाल करू,” असे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन्ही देश आपापल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक समन्वय परिषद स्थापन करतील. त्यांच्या विद्यमान संयुक्त आयोगालाही सचिव स्तरावरून मंत्री स्तरावर उन्नत केले जाईल असे सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी उझबेकिस्तानला “मध्य आशियाच्या केंद्रस्थानी” आणि या प्रदेशासोबतच्या भारताच्या संबंधांमध्ये मध्यवर्ती स्थान असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, भारत आणि उझबेकिस्तानमधील घनिष्ठ संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हे दोन्ही देशांमधील गाढ परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. येत्या काही वर्षांत, आम्ही आपल्या दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये थेट संबंध, सह-उत्पादन आणि सह-विकासाला प्रोत्साहन देऊ असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारत आणि उझबेकिस्तान दहशतवाद, अतिरेकीपणा आणि फुटीरतावाद यांना प्रादेशिक स्थिरतेपुढील मोठी आव्हाने मानतात आणि यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारतात. द्विपक्षीय व्यापार १ अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, आता दोन्ही देशांचे २०३० पर्यंत तो ५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. बाजारपेठ उपलब्धता, कनेक्टिव्हिटी, बँकिंग आणि पेमेंट प्रणाली सुधारण्यासाठी ते पद्धतशीरपणे काम करतील असेही यावेळी सांगितले.

भारत आणि उझबेकिस्तान एक संयुक्त व्यावसायिक शिखर परिषद आयोजित करतील आणि दोन्ही देशांसाठी संधी निर्माण करणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची चाचपणी करतील.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या विकासात परस्पर फायद्याचे सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही एकत्र काम करू, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वपूर्ण खनिजे, अवकाश आणि अणुऊर्जा या क्षेत्रांतील सहकार्यामुळे हे संबंध भविष्यासाठी सज्ज होत असल्याचेही सांगितले.

ऊर्जा संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारताला युरेनियम पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन व्यवस्था प्रस्थापित करण्याकरिता दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.

नागरी वापरासाठी अणुऊर्जा निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी नवी दिल्ली उझबेकिस्तानकडून युरेनियम आयात करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यात स्वच्छ ऊर्जा हा चर्चेतील प्रमुख विषयांपैकी एक होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही भागीदारी केवळ नवी दिल्ली आणि ताश्कंदपुरती मर्यादित राहू नये. स्थानिक पातळीवर संबंध अधिक व्यापक करण्यासाठी भारत आणि उझबेकिस्तान त्यांच्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये भागीदारी प्रस्थापित करतील.

दोन्ही देशांच्या विकास उद्दिष्टांमधील साम्य अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, युवा, नवोपक्रम, सर्वसमावेशक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान हे ‘नवे उझबेकिस्तान’ आणि ‘विकसित भारत २०४७’ या दोन्हीसाठी केंद्रस्थानी आहेत.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि उझबेकिस्तानच्या आकांक्षा आणि विचारांमध्ये खूप साम्य आहे. या सामायिक दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करत आहोत, असे सांगितले.

या दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांनी पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य सन्मान, ‘ओली दराजाली दोस्तलिक’ हा पुरस्कार प्रदान केला. हा पंतप्रधानांचा ३६ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता.

पंतप्रधान मोदींनी हा सन्मान स्वीकारणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आणि तो भारत व उझबेकिस्तानमधील मैत्रीला तसेच १.४ अब्ज भारतीयांना समर्पित केला.

पुरस्काराच्या नावावर भाष्य करताना ते म्हणाले की, ‘दोस्तलिक’ म्हणजे मैत्री आणि भारतीयांना ‘दोस्त’ किंवा मित्र हा शब्द परिचित आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दोस्तलिक’ या नावाने भारत-उझबेकिस्तान संबंधांचा आत्मा व्यक्त होतो आणि हा सन्मान एका व्यक्तीसाठी नसून भारतातील लोकांसाठी आहे, यावर त्यांनी जोर दिला.

Exit mobile version