राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकटसमयी जाहीर केलेल्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०७० हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिक ०९३२१५८७१४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवर देखील थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर जलद गतीने मदत कार्य राबवण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षही सज्ज ठेवण्यात आले आहेत, ज्यांचा मुख्य संपर्क क्रमांक १०७७ असा आहे, असे आवाहन ही यावेळी केले.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील क्षेत्रांतील नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी अजिबात न घाबरता या जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधून प्रशासकीय यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहनही यावेळी केले.
