राज्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेती, घरे व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेत ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांच्या मदतीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबत माहिती देताना, या निर्णयामुळे राज्यातील हजारो बाधित कुटुंबांना तातडीचा आधार मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
शासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील विविध विभागांतील एकूण ६६ हजार ३१२ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ४९ हजार ५११.७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शासनाने तातडीने आर्थिक मदत मंजूर करत पुनर्वसन प्रक्रियेला गती दिली आहे.नागपूर विभागात वर्धा, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये १,५०४ शेतकरी बाधित होऊन ६६५.५२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यासाठी ११३.१५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित आहे. पुणे विभागात सोलापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये मिळून ४,५६४ शेतकरी बाधित झाले असून, ९६६.२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे; यासाठी ५७७.९३ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
अमरावती विभागात सर्वाधिक फटका बसला असून, बुलढाणा, यवतमाळ व इतर भागांतील ५१ हजार ७२९ शेतकरी बाधित झाले आहेत. या विभागात तब्बल ४२ हजार ३८८.९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यासाठी ४२३७.९७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड, लातूर व बीड जिल्ह्यांमध्ये मिळून ८,५१५ शेतकरी बाधित झाले असून, ३,४९१.०३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या भागासाठी ४४४.०२ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले की, नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, मदत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता व वेग राखण्यावर शासनाचा विशेष भर राहणार आहे. जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना सतत परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनानेही युद्धपातळीवर काम सुरू केले असून, बाधित भागांमध्ये मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पुनर्वसन प्रक्रियेला निश्चितच गती मिळणार आहे.
“संकटात दिलासा… शासनाची संवेदनशील साथ”
अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या जनजीवनाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांची भरीव मदत मंजूर करत संवेदनशीलतेची जाणीव करून दिली आहे. या निर्णयातून पिकांचे नुकसान, घरांची पडझड तसेच इतर मालमत्तेच्या हानीचा सामना करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना तातडीने आधार मिळणार आहे. नुकसानाचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करत मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व वेग यावर शासनाचा विशेष भर आहे. जिल्हाधिकारी व प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत होत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.या निर्णयामुळे आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळून संकटातून सावरण्यासाठी शासनाची भक्कम साथ लाभणार आहे.
