Marathi e-Batmya

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाची सोमवारी ३० मार्चला ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एल्गार पुकारला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. या यात्रेची सुरुवात सोलापूर तुळजापूर महामार्गावरील सुरतगाव येथून सकाळी ८ वाजता होणार असून यात्रेचा समारोप संध्याकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात येथे सभेने होणार आहे.

शेतकरी विरोधी भाजपा सरकारच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भाजपा सरकारच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत. भाजपा सरकार एमएसपीचा कायदाही करत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणाही भाजपा सरकारने केल्या पण त्याही कागदावरच राहिल्या आहेत. यात भरीस भर म्हणून मोदी सरकारने अमेरिकेबरोबर व्यापारी करार करून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस संसद, विधिमंडळ व रस्त्यावरही लढत असून, या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.

Exit mobile version