नागपूरः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या महायुतीतील बेबनावामुळे भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसल्याने सत्तेची गणिते कशी जुळवायची या प्रयत्नात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आहेत. तर दुसऱ्याबाजूला सरकार स्थापनेच्या अनुषंगाने राजकिय चर्चा सुरु असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या पेटरी गावाला भेट देत काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया जावून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. मात्र राज्य सरकारकडून काहीच मदत मिळत नाही. तसेच पिकांचा पंचनामा करण्यासाठी कोणी जात नसल्याने शेतकऱ्यांना आस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. विदर्भातील अशा शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
सत्ता स्थापन होणार की नाही या विवंचनेत अख्खा महाराष्ट्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर पोचले आहेत.
नागपूर हे संत्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेच पीक संकटात आले आहे. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले आशिष देशमुख आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील शेतकऱ्यांची पवारांनी जाणून घेतली व्यथा
