Marathi e-Batmya

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत अजित पवारांनी दिले हे आश्वासन

मराठी ई-बातम्या टीम

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सरकारच्यावतीने आज दिले.

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील घोषणा केली.

विदर्भातील एका आमदारने याबाबतचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, दरवर्षी नागपूरात अधिवेशन भरविले जाते. या अधिवेशात धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. मात्र मागील दोन वर्षापासून नागपूरात अधिवेशन झालेले नसल्याने किमान येथील अधिवेशनात तरी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहिर करा अशी मागणी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील आश्वासन दिले.

मुळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी बर्‍याचदा व्यापारी वर्गाकडे पैसे जातात. आजुबाजुला असणाऱ्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र त्या राज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि ते पण बोनसचा फायदा घेतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांची बैठक घेतली होती असेही त्यांनी सांगितले.

या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी चाललेली आहे ती फार मोठी आहे याचा विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचेही त्यांनी त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

त्यानंतर विधानसभेत अनेक आमदारांनीही या संदर्भात प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version