पानी फाऊंडेशन मार्फत २०२२ पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात ४६ तालुक्यात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानी फाऊंडेशन यांच्या प्रयत्नाना सुरूवातीपासूनच साथ लाभली आहे. विविध टप्प्यात शेतक-यांसाठी काम करत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ चा शुभारंभ सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च २०२५ रोजी फार्मर कप २०२४ मधील शेतकरी गटांना सन्मानित करताना फार्मर कप उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रात ३५१ तालुक्यात विस्तार करावा अशा सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, ग्रामविकास मधील महिलांच्या उपजीविकेसाठी काम करणारी उमेद व पानी फाऊंडेशन यांच्या सहभागातून शेतकऱ्यासाठी जनचळवळ उभी करण्यासाठी एकत्र विविध टप्प्यावर कार्यवाही सुरू आहे .
पहिल्या टप्प्यात कृषि विभागातील १२ हजार १११ व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति (ग्रामसखी ) ३०३५९ यांचे फार्मर कप व गटशेतीचे महत्व यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. दुस-या टप्प्यामध्ये ४५ हजार १९० शेतकरी व कृषिसखी यांना फार्मर कप उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.तिसऱ्या महत्वाच्या टप्प्यात ३६ प्रशिक्षण केंद्रावर शेतकरी व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति अशा ३२ हजार ९९३ शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करण्यात आले.चौथ्या टप्प्यामध्ये गटशेतीतूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात.शेतीचा खर्च कमी होवून पिकाची उत्पादकता वाढवीता येते, कृषि विद्यापीठाच्या शेतीत प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब केला , तर शेतकऱ्यांचा प्रवास समृद्धिकडे होईल . यासाठी शेतकरी गट बांधणी मध्ये शेतकऱ्यानी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व एक पीक, एक गट अंतर्गत २५ हजार ८२३ शेतकरी गट फार्मर कप उपक्रमासाठी सज्ज झाले आहेत.पाचव्या टप्प्यामध्ये शेतकरी गटाना ज्ञान मिळावे यासाठी कृषि विद्यापीठातील शात्रज्ञ यांच्या मदतीने खरीप हंगामामधील पिकासाठी दररोज डिजिटल शेतीशाळा २५ मे २०२६ पासून सुरू करण्यात आल्या आहेत. सहाव्या टप्पयामध्ये २५ हजार ८२३ शेतकरी गट शेतीत येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी “सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ “ साठी सज्ज झाले आहेत, स्पर्धेसाठी त्यांनी सुरुवात केली आहे.
फार्मर कप म्हणजे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून समृद्धीकडे वाटचाल करणे या महत्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावेल अशी माहिती कृषि आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली .
